पुणे : गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून उच्चशिक्षित दाम्पत्याने सेवानिवृत्त शास्त्रज्ञाची एक कोटी १६ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उच्चशिक्षित दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात जितेंद्र शेडगे आणि त्याची पत्नी प्रीती यांच्या विरोधात माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणूक या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका सेवानिवृत्त शास्त्रज्ञाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मूळचे नागपूरचे आहेत. या प्रकरणात जितेंद्र शेडगेला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शेडगे दाम्पत्याने पुणे सिटी डील्स डॅाट कॅाम नावाचे संकेतस्थळ सुरू केले होते. शेडगे दाम्पत्याने सुरुवातीला मोबाइल रिचार्ज, वीजदेयक भरण्याची उपलब्ध करून दिली होती. संकेतस्थळाच्या माध्यमातून मोबाइल रिचार्ज, वीज देयक भरल्यास शेडगे दाम्पत्याने काही सूट देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आरोपींनी २०१९ मध्ये गुंतवणुकीवर परतावा देण्याची योजना सुरू केली होती, अशी माहिती सायबर पोलिसांकडून देण्यात आली.

गुंतवणूकदारांनी शेडगे दाम्पत्याने सुरू केलेल्या योजनेत पैसे गुंतवले होते. काहींना परतावाही देण्यात आला होता. त्यामुळे गुंतवणूक योजनेबाबत माहिती घेण्यासाठी नागपूरमधील तक्रारदार शास्त्रज्ञाने संपर्क साधला. शेडगे दाम्पत्याने त्यांना योजनेची माहिती दिली. जादा परताव्याचे आमिष दाखवून शेडगे यांनी त्यांना जाळ्यात ओढले. आरोपी शेडगे दाम्पत्याने केलेल्या बतावणीवर विश्वास ठेवून गेल्या दोन वर्षात तक्रारदार शास्त्रज्ञाने स्वत:कडील तसेच नातेवाईकांकडील एक कोटी १६ लाख ५२ हजार रुपये शेडगे दाम्पत्याच्या योजनेत गुंतवले. गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर परतावा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जाची शहानिशा करुन सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जितेंद्र शेडगेला अटक केली.

सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा

आरोपी शेडगे दाम्पत्याने गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. तक्रारदारांनी सायबर पोलीस ठाण्यात (शिवाजीनगर पोलीस मुख्यालय) तक्रार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired scientist cheated of rs 1 16 crore through investment fraud pune print asj