मुलगा होत नसल्याने अमेरिकेत राहणाऱ्या संगणक अभियंता पत्नीचा पतीकडून वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सध्या ही पीडित पत्नी पुण्यात राहत असून तिचा पती अमेरिकेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघेही उच्च शिक्षित असून संगणक अभियंता आहेत. याप्रकरणी पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिचा पती, सासू-सासरे यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांच्या माहितीनुसार, ३८ वर्षीय फिर्यादी महिलेचा आणि आरोपी पतीचा अकरा वर्षांपूर्वी विवाह झाला. दोघेही उच्चशिक्षित संगणक अभियंता आहेत. दोघेही अमेरिकेत नामांकीत कंपनीत कामाला होते. मात्र, सध्या फिर्यादी महिलेने अमेरिकेतील नोकरी सोडली असून ती पुण्यात राहत आहे.

या दाम्पत्याला एक सात वर्षांची गोंडस मुलगी आहे. मात्र, मुलगा होत नाही म्हणून संबंधीत महिलेला पतीकडून वारंवार मारहाण करण्यात आली आहे. पतीच्या या कृत्याला सासू सासरे देखील साथ देत असल्याचा आरोप पीडित महिलेने आपल्या तक्रारीत केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सततच्या मानसिक आणि शाररिक छळाला कंटाळून या महिलेने अखेर सांगवी पोलिसांत सासरच्या व्यक्तींविरोधात तक्रार दिली. या घटनेचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी या करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The wife of a computer engineer living in the usa torment by her husband for not having a son aau