लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : ‘राज्यातील शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा, संकलित चाचणी २ यासाठी जाहीर केलेल्या वेळापत्रकाबाबतच्या शिक्षकांनी मांडलेल्या समस्यांच्या खोलात जाऊन आवश्यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील,’ असे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे आयुक्त राहुल रेखावार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

राज्यातील पहिली ते नववीच्या परीक्षा एकाच वेळी घेण्यासाठीचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जाहीर केले आहे. त्यानुसार, ८ ते २५ एप्रिल या कालावधीत नियतकालिक मूल्यांकन चाचणी, संकलित चाचणी २ या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत लांबणार असल्याने उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करण्यास वेळच मिळणार नसल्याचा मुद्दा शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित करण्यात आला. या अनुषंगाने मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, सचिव नंदकुमार सागर, उपाध्यक्ष सचिन नलावडे, सचिव आर. वाय. पाटील, माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेऊन वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली.

रेखावार म्हणाले, ‘वेळापत्रकामुळे निर्माण होणाऱ्या समस्या शिक्षकांकडून मांडण्यात आल्या. त्या समस्यांना उत्तरेही देण्यात आली. मात्र, समस्यांच्या अधिक खोलात जाऊन काही उपाययोजना करणे आवश्यक असल्यास त्या केल्या जातील. आतापर्यंत १५ एप्रिलपर्यंत परीक्षा घेतली जात असली, तरी अभ्यासक्रम आराखड्यानुसार उर्वरित दिवस अध्ययन-अध्यापनासाठी न वापरले जाणे ही त्रुटी आहे. ती दूर केली पाहिजे. या वेळापत्रकानुसार होणारी सर्व कामे शैक्षणिकच आहेत. तसेच शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ उपलब्ध होणार आहे. आता नव्या रचनेनुसार शैक्षणिक कामकाज २३४ दिवस करावे लागणार आहे.’

भाषा, गणित अशा विषयांमध्ये अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग घेण्यात येणार आहेत. त्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता हे उद्दिष्ट ठेवून सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहेत, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What does education minister dada bhuse say about exam schedule being extended until end of april pune print news ccp 14 mrj