लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : येरवड्यातील पडक्या बंगल्यात तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. साहिल विलास कांबळे (वय १८, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील मुद्रणालयाजवळ एक जुना बंगला आहे. सध्या बंगला पडीक असून, तेथे फारसा कोणाचा वावर नसतो. साहिलने पडक्या बंगल्याच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. साहिलचा मृतदेह ससून रूग्णालयात शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला.
येरवडा पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी साहिलचे वडील विलास (वय ४५) यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही.