दर वेळी प्रथेप्रमाणे येणारी ही दिवाळी जरी जुनीच असली, तरी प्रत्येक नव्या दिवाळीचा दम मात्र दर वर्षी नवानवाच असतो. हेच या सणाचे वेगळेपण.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळी हा उमेदीला सलाम करण्याचा सण मानला पाहिजे. कडू करंटय़ासारख्या क्षुल्लक वस्तूलाही नरकासुर समजून त्याला पायाने चिरडताना, दुष्प्रवृत्तींना नष्ट केल्याचे समाधान शोधले जाते, तोवर नव्या उमेदीने उजाडणाऱ्या उद्याच्या आशा जिवंत राहणारच आहेत. नरकासुराच्या विविध अवतारांनी बोकाळलेल्या त्या प्रवृत्तींचा नायनाट करण्याची इच्छा जोवर  या लहानशादेखील कृतीतून उमटत राहील, तोवर कुप्रवृत्ती नाकारण्याची आणि सत्प्रवृत्तींचा स्वीकार करण्याची मानसिकता जिवंत राहणार आहे..

नरकासुर नावाच्या एका असुरवधाच्या पुराणकथेचा काळ मागे पडला, त्यालाही आता किती तरी वर्षे लोटली आहेत. तरीही, आजही वेगवेगळ्या रूपांनी व्यापून राहिलेल्या नरकासुर या नावाचे वलय मात्र मनामनावर कायमच असल्याने दिवाळीच्या दिवसांत नरकासुरवधाचा आनंद साजरा केला जातोच. भय, चिंता, वेदना आणि दु:खे या माणसाला सतत सतावणाऱ्या समस्यांपासून आणि त्यांच्या हातात हात घालून दिवसागणिक नव्याने उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांपासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी, असा आपला समज असतो. त्यामुळे रानावनातल्या वेलीवर उगवणाऱ्या, काकडीच्या जमातीतील एका कडवट गोलाकार फळाला नरकासुर समजून पायाखाली चिरडून त्याचा पुरता नायनाट केल्यावर आपणच या कडू करंटय़ाला  यमसदनी पाठविल्याचा क्षणभंगुर आनंद या दिवशी मिळवण्याचा प्रयत्न करतो, आणि ती कृती केल्यावर भयमुक्त झाल्याचे समाधान करून घेत आपल्या दैनंदिनीत व्यस्त होतो. तसे पाहिले, तर दिवाळी हा अवघा सणच, दु:खे विसरण्याच्या आणि आनंदात असल्याच्या भावनेने स्वत:चे समाधान करून घेण्याचा सण असतो. या दिवशी घराघरांतील अंधाराचे कोपरे नष्ट करून घरे प्रकाशाने उजळावीत, म्हणजेच समस्यारूपी अंधाराचा नायनाट करून नव्या प्रकाशात जीवन उजळून घेण्याचा एक प्रयत्न करावा, असे मानले जाते. गेल्या कित्येक पिढय़ांपासून आपण प्रत्येक दिवाळीत तेच तर करीतही आलो आहोत. दर वर्षी अशीच दिवाळी येते, आपणही दर वर्षी प्रथेप्रमाणे आनंदाचे तेच मुखवटे चढवून त्याखाली आपल्या दैनंदिन समस्या, वेदना, दु:खे आणि चिंता लपविण्याचा प्रयत्न करतो, परस्परांना शुभेच्छा देऊन अशाच प्रयत्नांसाठी इतरांनाही भावनिक प्रोत्साहन देतो आणि क्षणकाळासाठी का होईना, वेदना विसरण्याचा आनंद खरोखरीच अनुभवता आला, या समाधानात फटाके फोडून, शोभेच्या दारूची आतषबाजी करून आणि गोडधोडाचे खाऊन हा आगळा आभासही प्रत्यक्षपणे साजरा करतो.

वर्षांनुवर्षांपासून दिवाळीच्या रूपाने हीच प्रथा सुरू आहे, पण या प्रथेचा आपल्याला कधीच कंटाळा येत नाही, किंवा त्या प्रथा कधीही नकोशाही वाटत नाहीत. म्हणूनच, धनवंतांच्या आलिशान हवेल्यांपासून गरीब कुटुंबाच्या चंद्रमौळी घरांपर्यंत सर्वत्र दिवाळीच्या सणाचा आनंद बहुधा सारखाच असतो. त्यांच्या साजरेपणाच्या संकल्पनांत कदाचित कमीअधिकपणा असेल, पण दिवाळी म्हणून त्यांनी जे काही साजरे केलेले असते, ते नक्कीच त्यांच्या, तात्पुरत्या असल्या तरी, समाधानाचे निधान असते. म्हणूनच दर वेळी, प्रथेप्रमाणे येणारी ही दिवाळी जरी जुनीच असली, तरी प्रत्येक नव्या दिवाळीचा दम मात्र दर वर्षी नवानवाच असतो. हेच या सणाचे वेगळेपण. दिवाळीच्या सणावर व्यापाराने कब्जा केल्यापासून या सणामागील पुराणकथा अलीकडे बासनात जाऊ  पाहत आहेत. ते तसे होणे साहजिक आणि अपरिहार्यही आहे. कारण जगण्याच्या संकल्पनांमध्ये काळाच्या ओघात होत चाललेला, आणि सर्वागांना व्यावहारिकतेच्या निकषावर व्यापणारा बदल डावलून जुन्याला कवटाळून बसणे आता आणि यापुढेही शक्यच होणार नाही. आभासी आयुधांनी अवघ्या जगाचे भौगोलिक अंतर केव्हाच पुसून टाकले आहे. अवघे जगच जवळ आल्याने, कोणताही सण ही कोणा विशिष्ट समाजाची मक्तेदारीही राहिलेली नाही. त्यामुळेच दिवाळीचा सण हादेखील त्याला अपवाद नाही. दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि चैतन्याचा सण आहे, ही तर सर्वमान्यच संकल्पना असल्याने, आनंद, उत्साह आणि चैतन्य साजरे करण्याच्या परंपरांमध्ये काळासोबत घडणाऱ्या बदलाचे प्रतिबिंब या सणावर पडणार, हे साहजिकही आहे. आमच्या वेळची दिवाळी कशी होती, अशा स्मरणरंजनात रमणाऱ्या आणि उत्तररंगाच्या सावलीत वावरणाऱ्या पिढय़ांनाही या नव्या दिवाळीच्या नवलाईने आणि नव्या दमाच्या उत्साहाने भारून टाकलेले दिसते, ते त्यामुळेच. दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दिवाळीच्या तोंडावर सुरू झालेल्या जाहिरातींमध्येही, या सणाने पिढय़ांचे अंतर पुरते पुसलेले दिसते. असे हे सारे काही, जरी बऱ्याच अंशी आभासीच असले, तरीदेखील जुन्या-नव्याचा आगळा मिलाफ घडविण्याची ताकद या तीन-चार दिवसांच्या साजरेपणात असते, म्हणून हा सण वेगळा मानलाच पाहिजे.

अशी ही दिवाळी आजही पुन्हा परंपरेनुसार दाखल झाली आहे. आज घरोघरी अभ्यंगस्नाने झाली असतील. गावागावांतील दिवाळी आणि शहरी दिवाळीच्या पाऊलखुणा वेगळ्याच असतात. गावांमधील पहाट धुक्याच्या दुलईने लपेटलेली असेल, तर शहरांची पहाट फटाक्याच्या धुरांनी घुसमटलेली असेल. गावागावातील पहाटेला घराघरांतील रेडियोवर नरकासुरवधाची कीर्तने ऐकत अभ्यंगस्नाने आटोपली असतील, तर शहरांची दिवाळी सुरेल पहाटसुरांच्या लगडी उलगडत उजाडली असेल. या साऱ्या साजरेपणात, जगण्यातील आनंदाचे हरवू पाहणारे क्षण शोधण्याची आणि ते घट्ट धरून ठेवण्याची उमेद लपलेली असते. या अदम्य उमेदीमुळेच तर, खरे म्हणजे, सारे जण नव्याने उजाडणाऱ्या नव्या, प्रत्येक उद्याची प्रतीक्षा करीत असतात. उद्याचा दिवस उजाडेल, आणि तो आपल्या जीवनात काही तरी नवे घेऊन येईल, या आशेवर प्रत्येक क्षण मागे लोटत सारे जण पुढच्या क्षणाच्या दिशेने धावत असतात. दिवाळी हा या उमेदीला सलाम करण्याचा सण मानला पाहिजे. कडू करंटय़ासारख्या  क्षुल्लक वस्तूलाही नरकासुर समजून त्याला पायाने चिरडताना, दुष्प्रवृत्तींना नष्ट केल्याचे समाधान शोधले जाते, तोवर नव्या उमेदीने उजाडणाऱ्या उद्याच्या आशा जिवंत राहणारच आहेत. नरकासुराच्या विविध अवतारांनी बोकाळलेल्या त्या प्रवृत्तींचा नायनाट करण्याची इच्छा जोवर प्रबळपणे या लहानशादेखील कृतीतून उमटत राहील, तोवर कुप्रवृत्ती नाकारण्याची आणि सत्प्रवृत्तींचा स्वीकार करण्याची मानसिकता जिवंत राहणार आहे. तसे पाहता, दु:ख, दैन्य, दारिद्रय़, भय, भूक, भ्रष्टाचार, ही नरकासुराचीच आधुनिक रूपे आहेत. आणि या रूपांनी नरकासुराने केवळ आपले भवतालच नव्हे, तर अवघे जगदेखील व्यापून टाकलेले आहे. गेल्या काही वर्षांत या असुराची असंख्य विक्राळ रूपे आपणही अनुभवली. या राक्षसाच्या पीडेतूनच असंख्य शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवून मरणाला कवटाळले, तर गरीब आदिवासींच्या झोपडय़ांतील हजारो निष्पाप, कुपोषित बालकांचा या राक्षसानेच बळी घेतला. रोगराईच्या रूपाने या राक्षसाने जागोजागी थैमान घातले, तर भ्रष्टाचार आणि महागाईच्या रूपाने सामान्यांचे जिणेदेखील या राक्षसानेच असह्य़ करून सोडले. सीमेवरच्या जवानांना पलीकडच्या नरकासुरांशी तर रोजचेच लढणे भाग आहे, तर सीमेच्या आतला सामान्य समाज नरकासुराच्या अशा अनेक अवतारांशी रोजचीच झुंज देत जगतो आहे.

दिवाळीचा हा पहिला दिवस या लढाईला नवी उमेद देण्याचा दिवस आहे. गेल्या तीन-चार वर्षांत महाराष्ट्रावर दुष्काळाच्या रूपाने नरकासुराची झडप पडली होती. यंदाची दिवाळी समृद्धीची चिन्हे सोबत घेऊन दाखल झाली आहे. दुष्काळासारख्या भयानक शत्रूला परतवून लावून निसर्गानेच नवचैतन्याची झालर लावलेली, नव्या उमेदीने बहरलेली दिवाळी यंदा आपल्यासाठी समोर आणली आहे. आपल्याआपल्या कुवतीप्रमाणे या दिवाळीचे स्वागत केलेच पाहिजे. नव्या दमाने दाखल झालेल्या या जुन्या दिवाळीच्या रूपाने प्रत्येक जगण्यावर आनंदाची, भरभराटीची आणि समस्यामुक्तीच्या समाधानाची आगळी झळाळी चढावी आणि नव्या उत्साहाने नव्याने उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचे स्वागत करण्याची उमेद मनामनांत उजळावी, हीच सर्वासाठी शुभेच्छा!

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali is the biggest indian festival that is celebrated across the country