भाजपला गेल्या नऊ वर्षांत व्यापक जनाधार मिळाला असला तरी दक्षिण भारतात कर्नाटकवगळता पाळेमुळे रोवता आलेली नाहीत. पाचच महिन्यांपूर्वी कर्नाटकची सत्ताही भाजपला गमवावी लागली. परिणामी दक्षिण भारतात अन्य राज्यांमध्ये पक्ष विस्तारण्यासाठी भाजपचे धुरीण जंगजंग पछाडत आहेत. कर्नाटकात विधानसभेची लोकसभा निवडणुकीत पुनरावृत्ती टाळण्यासाठी अलीकडेच, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाशी भाजपने हातमिळवणी केली. दक्षिणेत एक नवीन मित्र जोडल्याचे समाधान असतानाच, तमिळनाडूत अण्णा द्रमुकने भाजपशी काडीमोड घेण्याचा निर्णय जाहीर केला. तमिळनाडूत भाजपला अद्यापही पक्षविस्तार करणे शक्य झालेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तमिळनाडूत दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकसह युतीत भाजपचे चार आमदार निवडून आले होते. पण वर्षभरापूर्वी तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवताना भाजपला सहा टक्क्यांच्या आसपास मते मिळाली. तरीही पंतप्रधान व गृहमंत्री तमिळनाडूबाबत आशावादी दिसतात. वाराणसीतील तमिळ संगम, नवीन संसद इमारतीत लोकसभा सभागृहात चोल साम्राज्याचे प्रतीक असलेला सेन्गोल राजदंडासारखा बसविणे, संसद इमारतीच्या उद्घाटनाला तमिळ पुजारी, परदेश दौऱ्यात मोदी यांनी भाषणाची सुरुवात ‘वणक्कम’ने करणे यातून तमिळ जनतेची मने आणि मते जिंकण्याचा प्रयत्न अधोरेखित होतो.

तमिळनाडूत यश मिळवायचे असल्यास अण्णा द्रमुकची साथ हवी हे भाजपचे धोरण होते. मध्यंतरी इंडिया आघाडीला शह देण्याकरिता भाजपने एनडीए घटक पक्षांची बैठक घेतली तेव्हा अण्णा द्रमुकचे सरचिटणीस पलानीस्वामी यांना मोदी यांच्याबरोबरीने बसवण्यात आले होते. बाकी सर्व घटक पक्षांचे नेते मागील रांगेत होते. पण तमिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी दिवंगत अण्णा दुराई, जयललिता आदी नेत्यांवर वारंवार टीकाटिप्पणी केल्याने अण्णा द्रमुकने युती तोडली. तमिळनाडूतील प्रदेशाध्यक्षांमुळे अण्णा द्रमुकसारखा जुना मित्र भाजपने गमावला आहे. दिल्लीच्या आशीर्वादाशिवाय हे प्रदेशाध्यक्ष एवढी टोकाची भूमिका मांडणे कठीणच दिसते. अर्थात, अण्णा द्रमुक लोकसभा निवडणुकीत बरोबर येईल याबाबत भाजप नेत्यांना अजूनही विश्वास वाटतो.

शिवसेना, पंजाबमध्ये अकाली दल, बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल, गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष असे अनेक लहानमोठे मित्र पक्ष भाजपच्या कपटी राजकारणामुळे सोडून गेले. त्यात आता अण्णा द्रमुकची भर पडली आहे. आधी भाजपला साथ देणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीनेही नंतर भाजपपासून दूर राहणे पसंत केले. पक्ष वाढीसाठी मित्रपक्षांची मदत घ्यायची आणि नंतर ते पक्ष कमकुवत करायचे हे भाजपचे धोरण. २८ पक्षांच्या इंडिया आघाडीचे आव्हान उभे ठाकताच भाजपने ३८ लहान-मोठय़ा पक्षांची मोट बांधून ‘एनडीए’ बळकट असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. नऊ वर्षांत प्रथमच मित्रपक्षांना एकत्र जमविण्यात आले याचाच अर्थ भाजपला ‘इंडिया’ आघाडीचे आव्हान वाटत असावे. अण्णा द्रमुकसारखा जुना मित्र केवळ प्रदेशाध्यक्षांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोडून गेल्याने भाजपलाच मित्र नकोसे झाले असावेत, असा अर्थ काढला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anvyartha bjp in south india anna dmk breaks alliance with bjp in tamil nadu ysh