देशाला देण्याजोगे आता माझ्याकडे काहीही नाही, असे म्हणत बाजूला होण्याची भाषा करण्याइतके परखड आत्मपरीक्षण जेसिंडा अर्डर्न यांनी कसे केले असेल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशासाठी, समाजासाठी करता येण्यासारखे शक्य ते सगळे आपण केले असून आता देण्यासारखे, करण्यासारखे आपल्याकडे काहीही नाही, असे म्हणत अवघ्या ४२ व्या वर्षी देशाच्या राजकारणातील सर्वोच्च पदाचा, म्हणजे पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेणे या गोष्टीची आजच्या काळात तरी गणना वेडेपणाच्या कोटीतच केली जाऊ शकते. हातात सत्ता नसेल तर ती मिळेल त्या मार्गाने मिळवणे, असेल तर मिळेल ते सगळे ओरबडून घेणे आणि वर सर्व मार्ग वापरून हातामधली सत्ता आपल्याकडेच नाही तर आपल्या पुढील सात पिढय़ांच्या हातात टिकून कशी राहील हे पाहणे हाच आजच्या काळात सगळीकडचाच ‘राजधर्म’ असताना न्यूझीलंडसारख्या चिमुकल्या देशातली एक स्त्री अगदी तरुण वयात धडाडीतून मिळवलेल्या आणि टिकवलेल्या पंतप्रधानपदावर अवघ्या पाच वर्षांत सहजपणे पाणी सोडते, हे खरोखरच अनाकलनीय आहे. न्यूझीलंडच्या ४० व्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचा हा अशा पद्धतीचा सत्तात्याग जगात नवे पायंडे पाडेल का ते माहीत नाही, कदाचित नाहीच पाडणार, पण राजकारणामधलीच नाही तर कोणत्याही क्षेत्रामधली अभिजातता, प्रगल्भता, माणूस म्हणून वाढण्याची, घडण्याची ऊर्मी काय असते हे मात्र त्यांच्या या एका कृतीने सगळ्या जगाला दाखवून दिले आहे.

वयाच्या १७ व्या वर्षी राजकारणात आलेल्या आणि आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात व्हाइट आइसलॅण्ड या ज्वालामुखीचा उद्रेक, करोनाची महासाथ यांसारख्या मोठय़ा नैसर्गिक आपत्ती, तसेच ख्राईस्टचर्च येथील दोन मशिदीवरील दहशतवादी हल्ले यांसारख्या संकटांना समर्थपणे सामोरे जाणाऱ्या जेसिंडा यांचे राजीनाम्याचा निर्णय सांगणारे भाषण सगळय़ांच्याच डोळय़ात अंजन घालणारे आहे. त्या म्हणतात, ‘‘मी एक माणूस आहे. कुणीही आपल्या देशासाठी शक्य असते, ते सगळे करत असतोच. पण तरीही कधीतरी थांबायची वेळ येतेच. माझी ती वेळ आली आहे. देशाचे नेतृत्व करायला मिळणे ही फार मोठी, दुर्मीळ आणि आव्हानात्मक संधी आहे, हे मला माहीत आहे. पण ती घेण्यासाठीची आवश्यक तेवढीच नाही, तर त्याहून थोडी जास्तच क्षमता तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ती घ्यावी.. हे जबाबदारीचे पद केव्हा घ्यायचे आणि केव्हा थांबायचे हे कळणे हीदेखील एक जबाबदारीच आहे..’’

स्वत:च्या क्षमतांचे पुरेपूर भान बाळगणारे आणि मर्यादांची यथार्थ जाणीव असलेले हे भाषण म्हणजे जणू एक शिल्पच आहे, स्वत:ला कोरून काढणारे.. स्वत:बरोबर स्वत:च्या काळाला घडवणारे.. जेसिंडा अर्डर्न यांचे बाकी सगळे तपशील त्यांच्या या संदर्भातील वृत्तांमधून प्रसिद्ध झाले आहेतच. नेतृत्व म्हणजे काय हे त्यांनी त्यांच्या याआधीच्या कामांमधून सिद्ध केले आहे, हे त्यातून दिसते, पण कारकीर्द ऐन भरात असताना थांबणे हे जगावेगळेच. हे कोण करतो? ज्याला जगाचे, जगण्याचे अचूक भान असते तो. दर पाच वर्षांनी पिढी बदलते असे मानले जात असेल तर वर्षांनुवर्षे तेच जुने नेतृत्व पदावर राहून कसे चालेल? स्वत:हून बाजूला होऊन नव्या पिढीला जागा करून देण्याची जबाबदारी कुणाची असते? नवी पिढी काळाचे नवे भान, नवी भाषा  घेऊन येत असते. समाज काळाबरोबर बदलत असेल तर नेतृत्वही बदलायला हवे. या नव्या काळाच्या गरजा वेगळय़ा आहेत, तिथे आपण पुरे पडू शकत नाही, त्याला काही देऊ शकत नाही, हे  भान बाळगणे आणि त्याप्रमाणे वागणे हे किती जणांना शक्य होते?

खरे तर कुणालाच नाही. म्हणूनच आपल्या म्हणजे तरुणांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशात ६० ते ७० हे राजकारणातील सरासरी ‘तरुण’ वय आहे. त्यामुळेच ८० च्या पुढची एखादी व्यक्ती पक्षाध्यक्ष होते. ५० च्या पुढची पक्षाचे युवा नेता असते. ७५ च्या पुढच्या व्यक्तीला पक्षात पद मिळणार नाही, असे भाजपला ठरवावे लागते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक.. आपल्या देशामधला कोणताही पक्ष घ्या. तरुण नेतृत्वाचे आपल्याला जणू वावडेच आहे. जास्तीचे पाहिलेले पावसाळे आणि चेहऱ्यावरच्या जास्तीच्या सुरकुत्या अनुभवांची संख्या सांगत असल्या तरी त्या नव्या काळाचे आव्हान पेलू शकत असतातच असे नाही. दररोज नवनवे तंत्रज्ञान येऊन धडकत असतानाच्या आजच्या काळात तरी अजिबातच नाही. अर्थात हे सगळे फक्त राजकारणापुरते मर्यादित नाही, तर सगळय़ाच क्षेत्रांबाबत आणि फक्त आपल्या देशातच नाही तर जगातल्या अगदी प्रगत म्हणवल्या जाणाऱ्या देशांबाबतही खरे आहे.

असे सगळे असताना आता माझ्याकडे देशाला देण्याजोगे काहीही नाही, असे म्हणत बाजूला होण्याची भाषा करणे हे एका परीने स्वत:च्या मर्यादांची याच्या त्याच्यासमोर नाही तर सगळय़ा देशासमोर कबुली देणेदेखील आहे.. इतके परखड आत्मपरीक्षण खरोखरच शक्य असते? पण ते शक्य होते तेव्हाच नवी क्षितिजे धुंडाळता येतात. एखाद्या क्षेत्रात एकदा चिकटले की जगाच्या दृष्टीने पेन्शनीत निघेपर्यंत किंवा आता तुम्ही थांबा असे कुणी तरी निर्वाणीचे सांगेपर्यंत तेच करत राहणारी माणसे सगळीकडेच आढळतात. ती त्यांची मर्यादाही असते आणि ताकदही. अनुभवातून त्या क्षेत्राचा अधिकार मिळत असला तरी तोच अनुभव त्यांना साचलेपणदेखील देतो. ते झुगारून नवे काही तरी करून बघण्याच्या, स्वत:ला नव्याने अजमावण्याच्या ऊर्मी खऱ्या अर्थाने जिवंत असलेल्या माणसांना स्वस्थ बसू देत नाहीत. त्यांना सतत कशाचा तरी नव्याने शोध घ्यायचा असतो. कुठे तरी थांबल्याशिवाय कुठल्या तरी पुढच्या मुक्कामावर जाता येणार नाही, हे त्यांना उमगलेले असते. आपणच उभारलेल्या कशाची तरी मोडतोड करून ते नवी क्षितिजे धुंडाळायला निघतात. आपल्याला त्या एका क्षेत्राचे नाही, तर जगण्याचे मर्म कळलेले आहे, हा विश्वास घेऊन ते निघालेले असतात.

आपले पंतप्रधानपद त्यागून जेसिंडा अर्डर्न बाईंना नुकत्याच शाळेत जाऊ पाहणाऱ्या आपल्या मुलीसाठी वेळ द्यायचा आहे. त्याबरोबरच आपल्या प्रिय जोडीदाराशी लग्न करून संसार थाटायचा आहे. पंतप्रधानपदी असताना गर्भवती राहणाऱ्या, रीतसर मातृत्वाची रजा घेणाऱ्या त्या बेनझीर भुट्टो यांच्यानंतरच्या जगातील दुसऱ्या पंतप्रधान आहेत. राजकारण करताना आपले स्त्री असणे त्यांनी कधी बाजूला ठेवले नाही. पण त्याचबरोबर वैयक्तिक जगण्यातही आपले राजकारण आणि पंतप्रधानपद डोकावू दिले नाही. म्हणूनच पंतप्रधानपद त्यागण्याच्या आपल्या निर्णयाला देशातील पुरुषप्रधान राजकारण कारणीभूत आहे, ही टीका ठामपणे नाकारून त्या म्हणतात की कोणतीही स्त्री तिच्या स्वत:च्या पद्धतीने नेतृत्व करू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत ती देशाचे नेतृत्व करू शकते. जेसिंडा यांच्या या धक्कादायक निर्णयावर त्यांच्या देशात अपेक्षेप्रमाणे टीका आणि कौतुक अशा दोन्ही प्रतिक्रिया होत्या. स्वत:च्या देशापेक्षाही देशाबाहेरच त्या जास्त लोकप्रिय आहेत, असाही त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. पण ते सगळे बाजूला पडून उजळून निघते आहे ते त्यांचे निखळ माणूसपण.

ही अशी प्रगल्भता, अशी मोकळीक कुठून येत असेल? देशाच्या सर्वोच्चपदी अशी व्यक्ती असेल तर तो देश कसा घडत असेल? एखाद्या स्त्रीने इतक्या सहजपणे ‘माणूस’ असणे खरोखरच शक्य असते का? एखाद्या स्त्रीने कोणते कपडे घालायचे याचीच ज्या समाजात अगदी राजकारण्यांच्या पातळीवर चर्चा होते, तिथे या प्रगल्भतेची कल्पना तरी करता येईल का? कोणत्याही क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीच्या खासगी जीवनाची चव्हाटय़ावर चर्चा करण्याचा आपल्याला जन्मसिद्ध हक्कच आहे असे जिथे मानले जाते तिथे जेसिंडा अर्डर्न जन्माला तरी येऊ शकतात का?

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial on new zealand pm jacinda ardern resignation zws
First published on: 21-01-2023 at 04:12 IST