परवाच एका पाश्चात्य प्राध्यापकाशी ओळख झाली. त्यांना मी अहोजाहो करू लागलो तेव्हा ते म्हणाले, मला फक्त नावानेच हाक मार. Name has nothing to do with respect. त्यांच्या या वाक्याने मी चमकलोच. लहानपणापासून माझ्या मनात हे कुठेतरी पक्कं बसलं होतं की, एखाद्या व्यक्तीविषयी आदर दाखवायचा असेल तर तो बोलण्यातनं ‘दाखवायला’ हवा. माझ्या आजूबाजूच्या समाजाचीही अशीच अपेक्षा होती. पण या प्राध्यापक महाशयांनी सागितलं की, आदर ही केवळ शिष्टाचारांमधून ‘दाखवण्याची’ गोष्ट नव्हे. आदर हा वागण्यातून दिसला पाहिजे. आपल्याकडे मात्र आपण कामात कितीही कार्यमग्न असलो तरी साहेब आल्यावर आदर दाखवलाच पाहिजे, म्हणून उठून उभे राहत असतो. याचाच अर्थ आपण कामातलं तादात्म्य महत्वाचं न मानता आदर दाखवण्याच्या उपचाराचे अवास्तव स्तोम माजवत असतो, असं नाही वाटत? वय आणि अनुभव या दोहोंना मान देऊच नये असं नक्कीच नव्हे. पण तो आदर व्यक्त करण्याच्या पद्धतीची जी सक्ती लादली जाते ती जाचक वाटू शकते. दुसऱ्याला अवास्तव आदर दाखवणं ही आपल्याला लागलेली सवय मानसिक गुलामगिरीचे तर लक्षण नाही ना? हुद्दा, वय, शिक्षण यांचं आपण स्तोम का माजवतो आहोत? हा बागुलबुवा आपल्याला दिवसेंदिवस खुजा तर बनावत नाही ना? खरं तर एखाद्या व्यक्तीविषयीच्या आदरयुक्त भावना या मनापासून यायला हव्यात. हात जोडावेसे वाटले तर आपोआप जुळतीलच आणि कुणासमोर नतमस्तक व्हावसं वाटलंच तर ते मनोमन झालं तरी पुरे! हेही वाचा : लेख: बेरोजगारांपेक्षा कंपन्याच लाभार्थी… कुणीतरी मला महत्त्व द्यावं असं वाटणं किवा मी कुणालातरी महत्त्व देणं गरजेचं आहे, अशी गरज निर्माण होणं, ही एक प्रकाराची मानसिक गुलामगिरी नव्हे का? या मनोवृत्तीमुळे आपण माणसा-माणसांतील निखळ नात्याला पारखे होत जाऊ अशी भीती वाटते. कारण आपण आपल्या मनाला सतत हे संगत असतो की, आपण सर्व एकाच दर्जाचे नाही आहोत. इथेच उच्चनिचतेची सुरूवात होते. हे सर्वप्रथम थांबायला हवं. स्वत:ला अति महत्त्व देणंही नको आणि मानसिक गुलामगिरीत डांबणंही नको. खराखुरा आदर राखण्यासाठीच आदर दाखवण्याच्या या उपचारांचा ‘आदरपूर्वक पुनर्विचार’ करायला हवा. नेमकं आजच हे ‘आदर पुराण’ लावण्याचे कारण काय? त्याचं असं झालं की, नुकत्याच मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात काॅ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा केवळ संदर्भ देताना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याप्रकरणी एका प्राध्यापिकेवर कारवाईचा बडगा उगारला गेला. तिच्या विरोधात विभागीय चौकशीसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाला चक्क एका पोलीस अधिकाऱ्यानेच पत्र लिहिलं! त्या पत्रातही त्याने मराठी भाषेच्या व्याकरणातील असंख्य चुका केल्या होत्या. याचा अर्थ त्या पोलीस अधिकाऱ्याला खरंच मराठी भाषा आणि भाषेचं व्याकरण कळतं का, हा प्रश्न पडतो. अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणं ही कोणत्या प्रकारची लोकशाही झाली? हे प्रकरण अर्थातच न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने त्या पोलीस अधिकाऱ्याला ‘तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का? आणि राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधित जो परिच्छेद आहे तो तरी तुम्हाला माहीत आहे का?’, असे प्रश्न विचारून त्या अधिकाऱ्यांची संतप्तपणे स्पष्ट शब्दात चांगलीच कानउघडणी केली, ते बरं झालं. हे ‘उच्चारी आदर’ देण्याचं प्रकरण गेल्या काही वर्षात व्हाट्सॲप विद्यापीठातून पदवीधर झालेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात फोफावलेलं दिसतंय. म्हणून हल्ली कुणी शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केला तर अंध शिवभक्तांच्या भावना लगेच दुखावतात, आणि ते दरडावून सांगू लागतात की, त्यांचा एकेरी उल्लेख करू नका. तो त्यांचा अपमान आहे. अशा वेळी मला हसू येतं. कारण आपल्याकडे शिवजयंती साजरी करणारे हेच तथाकथित शिवभक्त मिरवणुकांमधून दारू पिऊन डीजेवरील सवंग गाण्याच्या तालावर आचकट-विचकट नाचत असतात, तेव्हा ते शिवाजीराजांचा अपमान करत नाहीत, असं त्यांना वाटतं काय? हा तर दांभिकपणा झाला. पण अस्मितेचं राजकारण करणाऱ्या माणसांना मोठ्या माणसांचे गुण आचरणात आणण्यापेक्षा त्यांना उच्चारी आदर देणंच महत्वाचं वाटतं. खरंतर शब्दांपेक्षा त्याच्यामागील भूमिकेवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. पण आपल्याकडे आपण उच्चरवाने काय बोलतो यालाच महत्व दिलं जातं. हेही वाचा : आयुर्वेद पदव्युत्तर प्रवेशात ‘मराठी’ कोंडी विकसित पाश्चात्य देशात नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञाच्या हाताखाली काम करणारे ज्युनियर शास्त्रज्ञही त्यांना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारतात. याचा अर्थ ते त्यांचा अपमान करतात असा होत नाही. तो एक प्रेमाचा आणि आपुलकीचा भाग असतो. आपल्याकडेही देवाला मानणारे सगळे आस्तिक लोक सगळ्या देवांना अरेतुरेच करतात ना? तसंच देवी आणि आईलासुद्धा अगंतुगंच करतात ना? त्यावेळी देव, देवी आणि आई यांचा अपमान झालेला अंधभक्तांना वाटत नसेल तर त्यांना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का खटकावा? ‘शिवाजी कोण होता?’ या कॉ. गोविंद पानसरेलिखित पुस्तकामध्ये शिवरायांच्या नावाचा उल्लेख एकेरी आहे. खरं तर असा एकेरी उल्लेख कित्येक पोवाड्यांत आढळतो, इतकंच काय कित्येक ठिकाणी, माझं राजं, माझा शिवबा, असाही उल्लेख आहे. बरं, हे लोक सक्काळ-संध्याकाळ जय हनुमान, जय श्रीराम करत असतात… जय हनुमानजी किंवा जय श्रीरामजी नाही. जयंतीही साजरी करताना ‘हनुमान जयंती’ असा करतात, श्रीरामाचा कित्येक गीतात, अध्यायात थेट ‘रामा’ असा उल्लेख आहे. म्हणून तर, नको तिथे वाद उकरून काढणाऱ्या या लोकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि समजा, उद्या पानसरेंच्या पुस्तकाचं नाव बदललं तर त्यातला मथितार्थ बदलणार आहे का? तसंही पानसरेंनी त्यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात शिवाजी राजांचा एक उत्तम प्रशासन करणारा माणूस असा उल्लेख केला आहे, आणि व्याकरण दृष्ट्या तो एकेरीत असणं आवश्यक आहे. पण ज्यांचं भाषेचं ज्ञान शब्दार्थापलीकडे नाही आणि जे शिवाजीला देव बनवू पहात आहेत त्यांना एकेरी उल्लेख खटकल्यास नवल नाही. अशा लोकांना या महान व्यक्तीचा आदर्श आचरणापेक्षा नुसतं नामस्मरणच महत्वाचं वाटतं. कारण त्यात बिनडोकपणे जयजयकार करण्यापलीकडे करायचं काहीच नसतं. तेव्हा मुद्दा निव्वळ एकेरी उल्लेखाचा नसून त्यांच्या विचारांचा आणि ते विचार आचरणात आणण्याचा आहे, हे लक्षात घ्या. हेही वाचा : पूर व्यवस्थापनात धरण नियंत्रक अभियंत्यांनी कोणती तत्त्वे पाळायला हवीत? १) कोणाला एकेरी नावाने संबोधलं तर त्यांचं मोठेपण कमी होतं का? त्यांचं मोठेपण त्यांच्या कर्तृत्वात असतं… नावात नाही. २) पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ वा प्रा. नामदेवराव जाधव लिखित ‘खरा संभाजी’ अशी कितीतरी पुस्तकं आहेत जिथे एकेरी उल्लेख आढळेल. पण याचा अर्थ हा नक्कीच नाही की या लेखकांचा दोन्ही छत्रपतींचा अवमान करण्याचा उद्देश होता. उलट ही दोन्ही पुस्तकं वाचल्यावर कळेल की, वास्तववादी चरित्रं तर याच पुस्तकांत आहेत. ३) याशिवाय प्रबोधनकार ठाकरे यांचं ‘दगलबाज शिवाजी’ अशा नावाचंही एक पुस्तक आहे. नाव वाचून तेव्हाही लगेच लोक असेच भडकत होते. पण हे पुस्तक बाजारात आलं, लोकांनी वाचलं आणि ‘दगलबाज’ या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला तेव्हा टीका करणाऱ्या लोकांनीच प्रबोधनकार ठाकरे यांचं कौतुक केलं. ४) सावरकरांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. एवढंच काय, मागच्या शतकातील अनेक इतिहासकारांनी – अगदी सेतू माधवराव पगडीपासून अनेकांनी शिवाजी राजांचा एकेरीच उल्लेख केला आहे. याचा अर्थ या सगळ्या थोर माणसांना शिवाजी राजांचा अपमान करायचा होता असं म्हणता येईल का? हेही वाचा : राजीव साने : एक सृजनशील विचारक स्वतःच्या नावापुढे शिवभक्त लावणं, गळ्यात शिवाजी महाराजांची प्रतिमा अथवा राजमुद्रा यांचं लॉकेट घालणं ही तर हल्ली फॅशन झाली आहे. म्हणून काय या गोष्टी केल्यामुळे महाराजांवर आपलाच हक्क प्रस्थापित झालाय असं ते समजतात का? खरं पहाता जो कोणी शिवाजी महाराज यांच्यावर श्रद्धा ठेवत असेल तर तो जातपात पाळूच शकत नाही, मुस्लिम द्वेषी होऊ शकत नाही. कारण स्वतः महाराज धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) म्हणजेच त्या काळातील अठरापगड जातीतील सर्वांना एक साथ घेऊन त्यांना एकसमान मानणारे होते आणि ते मुस्लिम द्वेष्टे तर नव्हतेच नव्हते. मग हे सर्व धारकरी शिवभक्त मुस्लिम द्वेष का करतात? असे खोटे शिवभक्त होण्यापेक्षा, आणि एकेरी उच्चारामुळे राजांचा अपमान होतो, असं मानण्यापेक्षा त्यांच्यावर लिहिलेल्या एकांगी विचारसरणीच्या पुस्तकांपलीकडची थोडी तरी इतर पुस्तकं मन लावून त्यांनी वाचली पाहिजेत आणि त्याप्रमाणे तारतम्याने विचार करायचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे शिवाजी महाराज बऱ्यापैकी समजतील. तसंही महाराष्ट्र वगळता सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करूनच त्यांचा इतिहास शिकवला जातो. त्यामुळे एकेरी नावाने त्यांचं कर्तृत्व तसूभरही कमी झालं आहे असं मला तरी वाटत नाही. तेव्हा राजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून शंख करण्यापेक्षा स्वतःला शिवभक्त समजणाऱ्यांनी राजांना ‘डोक्यावर न घेता बुद्धीने ओळखावं’, हेच एक मागणं! jetjagdish@gmail.com ((समाप्त))