हे पाहा मास्तर, तुम्ही आम्हांला शिकवायचं कारण नाही, हे आपल्या विद्यार्थ्यांचे उद्गार ऐकून गुरुजी चमकलेच. बहुधा त्यांना त्या विद्यार्थ्यांमध्ये उद्याचे शिक्षणमंत्री दिसले असावेत. मास्तरांना शिकवायचे कारण नसून, त्यांनी त्याऐवजी शीरगणती करावी, पशुगणना करावी, आधार कार्डे काढून द्यावीत, झालेच तर विद्यार्थ्यांच्या सेल्फ्या काढाव्यात हे शासकीय धोरण एवढय़ा लहान वयात माहीत असलेला प्राणी हा उद्याचा थोर शिक्षणमंत्रीच होणार याबाबत गुरुजींच्या मनात शंका येण्याचे कारणच नव्हते. परंतु गुरुजी या नावास ते बिचारे उगाचच जागत होते. म्हणजे साधा सावकारीचा धंदासुद्धा ते करीत नव्हते, म्हणजे बघा! आता असते काही काही शिक्षकांना शिकवायची हौस, प्रयोगशील वगैरे म्हणवून घेण्याची आस.. त्याला शिक्षणखाते तरी त्यांच्या बदल्या करून त्यांना धडा शिकवण्याखेरीज काय करणार? तर गुरुजींनी शिकवण्याचा फारच हट्ट धरल्याने त्यांचा हा विद्यार्थी संतापला होता. गुरुजी त्याला समजावून सांगत होते, की बाबा रे, उद्या तुम्हाला तुमच्या पिताश्रींचा वारसा चालवून लोकशाही समृद्ध करायची आहे. पतपेढी, दूधडेरी, आमदारकी, किमानपक्षी ग्रामपंचायतीच्या शिक्षण समितीचे सभापतीपद तुमची वाट पाहात उभे आहे. असे असताना आपणांस किमान कौशल्याधारित शिक्षण तर घ्यावेच लागेल. त्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे, की आम्हाला ज्यादा शिकवायचं कारण नाही. आम्हाला माहीत आहे की राजकारणात जायला पदवीची काही गरज नसते. बरोबरच आहे. नसेल पदवीची गरज. आणि ती काय दोन दिवसांत परदेशातून आयातही करता येते. प्रश्न पदवीचा नसून, ज्ञानाचा आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, झालेच तर सामान्य विज्ञान, बीजगणित यांच्या अभ्यासाचा आहे. तर त्यावर विद्यार्थ्यांने मास्तरांना वेडय़ातच काढले. म्हणाला, प्रचारसभा म्हणजे काय प्रौढ शिक्षणाचा वर्ग वाटला काय तुम्हाला? तिथं काहीही फेकलं तरी चालतं, मास्तर. राहुलबाबांनी गणित चुकवलं. पण काय बिघडलं? मोदीसाहेबांनी इतिहास चुकवला, काय बिघडलं? तिथं गणितं वेगळी असतात मास्तर आणि इतिहास तर चुकवायचाच असतो. नाही तर त्याचं पुनर्लेखन कसं करता येणार? मास्तरांसाठी हे ज्ञानामृत नवेच होते. पूर्वी कोणा मास्तरांना व्यंकू नामक त्यांच्या विद्यार्थ्यांने असेच ज्ञानामृत चाखावयास दिले होते. हा नवा व्यंकू त्या व्यंकूचा हेडमास्तरच वाटत होता. तो सांगत होता, मास्तर, राजकारणातली शाळा वेगळीच असते. तिथं आपल्या नेत्याने खाल्ली तर श्रावणी आणि दुसऱ्याने खाल्लं तर शेण असंच असतं. निकाल त्यावर लागत असतो मास्तर.. गुण देणारे परीक्षकपण हेच पाहतात. गणित चुकलं की बरोबर, इतिहास खरा की खोटा हे फक्त तुमच्यासारखे बुद्धिजीवी तपासत बसतात. पण या देशात तुम्हांला कोण विचारतो, मास्तर?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on education in maharashtra