कुणाचीही हत्या वाईटच. ती पूर्ववैमनस्यातून होणे अधिकच वाईट. त्यातही साधूंची हत्या होणे हे किती दु:खद आणि किती चुकीचे, हे महाराष्ट्राला उत्तर भारतातील अनेक नेत्यांनीही गेल्याच आठवडय़ात वारंवार सांगितलेले आहे. याच उत्तर भारतातील एक महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील पगोना या गावातील मंदिरात दोघा साधूंची हत्या घडली, त्यामागे पूर्ववैमनस्य हे कारण असल्याचा कयास सुरुवातीला बांधला गेला. मात्र या दोघाही साधूंचे गळे दाबणारा आरोपी म्हणून कुणा मुरारी सहाय याला त्याच गावातील रहिवाशांनी पकडून  पोलिसांच्या ताब्यात दिले, त्यानंतर त्याने दिलेला जबाब अचंबित करणारा आणि या प्रकरणाला निराळेच वळण देणारा ठरेल, यात शंका नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पकडला गेलेला हा मुरारी नामक आरोपी आधीदेखील तुरुंगाची हवा खाऊन आलेला आहे, शिवाय तो नशेबाज आहे असे म्हटले जाते. अर्थात, उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था स्थिती ही दृष्ट लागण्याजोगी असल्याने अफू वगैरे मिळण्याचा प्रश्नच नाही आणि दारू वा तत्सम पेय तर २५ मार्चपासून संपूर्ण भारतभरात कोणालाही मिळतच नाही,  ही वस्तुस्थिती असल्यामुळे त्या मुरारी नामक आरोपीने भांगेची नशा केली होती, असेही सांगितले जाते. या मुरारीने पोलिसांना दोघा साधूंच्या हत्येविषयी जो जबाब दिला, तो माध्यमांतून प्रकाशित होण्याआधीच पोलिसांनी, ‘‘हा नशेत दिलेला जबाब आहे’’ असेही नमूद केलेले आहे. तरीदेखील मुरारीचा तो जबाब केवळ गुन्हे आणि कायद्याच्या क्षेत्रातच नव्हे तर राजकारण, समाजकारण अशा अन्यही क्षेत्रांमध्ये देखील नवी वाट दाखवणारा ठरेल.

‘माझे या दोघा साधूंपैकी कोणाशीही वैमनस्य नव्हते.. जे काही घडले ते देवाच्या इच्छेनुसारच घडले आहे.’ असे हा आरोपी म्हणाला. तांत्रिकदृष्टय़ा हा जबाब आहे की नाही, याविषयी उत्तर प्रदेशचे पोलीस खाते यथावकाश निर्णय घेईल. पण त्या राज्यात साधारण १९९२ पासून बऱ्याच गोष्टी ईश्वरेच्छेने घडू लागल्या, असा भाविकांचा विश्वास आहे. बुलंदशहरमधील त्या गावात दोघा साधूंची हत्या, ही यापैकी सर्वात अलीकडील म्हणावी लागेल. यातील ‘ईश्वरेच्छा’ हे कारण जर खरे मानले, तर बऱ्याच अन्य प्रश्नांचीही उत्तरे मिळतात. ‘या साधूंच्या खुनाचे राजकारण करू नये’ असा बंधुत्वाचा सल्ला रामलल्लाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालेल्या योगी आदित्यनाथ यांना दुसरे रामलल्लाभक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी का दिला असावा, याचा संबंधही ईश्वरेच्छेशी जोडता येतो.  किंबहुना ईश्वरेच्छा असेल तर राजकारण होत नाही, असाही एक सामाजिक सिद्धान्त मांडता येऊ शकतो.  एका  संशयित आरोपीच्या एका जबाबाने इतक्या क्षेत्रांवर प्रभाव पडू शकतो, याचे श्रेय उत्तर प्रदेश या राज्यालादेखील आहेच!

मराठीतील सर्व उलटा चष्मा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta ulta chasma article on sadhus killed inside temple in up abn