How to Check Beneficiary List of Ladki Bahin Yojana: माझी लाडकी बहीण या योजनेसाठी महाराष्ट्रातील लाखो महिलांनी अर्ज भरले आहेत. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकार या योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी पाठविणार असल्याची माहिती समोर आली होती. पण, आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की, सरकार त्याआधीच महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट १९ ऑगस्टच्या आधीच मिळणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली असून, या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट आहे. माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना लाभाचे वितरण १७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. आतापर्यंत जवळपास एक कोटी ३५ महिला पात्र ठरल्या असून, त्यांच्या खात्यात १७ ऑगस्ट रोजी पैसे जमा होणार आहेत. माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यात येत्या १७ ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. लाभार्थी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. वयाची किमान २१ वर्षे, तर कमाल ६० वर्षे पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला योजनेचा लाभ दिला जाईल. सदर लाभार्थींचे बँक खाते असणे बंधनकारक आहे. लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. त्यासाठी महिलांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, लाभार्थीचे आधार कार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. (हे ही वाचा: जिओ, एअरटेलचं सिम कार्ड BSNL मध्ये पोर्ट करायचंय? फक्त ‘या’ तीन स्टेप्स करा फॉलो; काहीच दिवसांत होईल मोबाईल नंबर पोर्ट) माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन लाभार्थी यादी कशी तपासणार? लाडकी बहीण योजना पात्रता यादीमध्ये नाव आले आहे की नाही हे तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने जाणून घेता येणार आहे. ज्या महिलांनी योजनेंतर्गत अर्ज केले आहेत, त्या महिला या योजनेशी संबंधित त्यांच्या अर्जांची स्थिती तपासू शकतात. योजनेच्या लाभार्थींनी यादीतील त्यांचे नाव तपासण्यासाठी पूर्ण करावयाच्या स्टेप्स खालीलप्रमाणे : महिलांना सर्वप्रथम त्यांच्या फोनवर प्ले स्टोअरवरून 'नारी शक्ती दूत' ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर पुढील नवीन पेजवर विचारलेली सर्व माहिती नीट भरुन मग अर्ज उघडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला मुख्यपृष्ठावर माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडायचा आहे. मग तेथे तुम्हाला लाभार्थी यादी पाहण्याचा पर्याय सापडेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे यादीमध्ये नाव आहे की नाही तपासू शकता. तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट असल्यास, योजनेंतर्गत तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील. जर तुमचे नाव लाभार्थी यादीत नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.