कल्याण – कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या एका इसमाला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याने सहा प्रवाशांचे मोबाईल चोरले आहेत. त्याच्याकडून एक लाख ४७ हजार रुपये किमतीचे चार महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. संबंधित इसम पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथील रहिवासी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रताप राजेंद्र डोके (३४) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात मागील काही महिन्यांपासून प्रवाशांच्या हातामधून, पिशवीतून मोबाईल चोरण्याचे प्रकार वाढले होते. सकाळच्या वेळेत प्रवासी लोकल पकडण्यासाठी घाईत असतात. काही जण मोबाईलवर बोलत फलाटावरून जात असतात. काही प्रवासी मेल, एक्सप्रेसने लांबचा प्रवास करून कल्याण रेल्वे स्थानकात उतरले की जवळील सामानाच्या पिशव्या घेऊन रेल्वे स्थानकाबाहेर पडत असताना त्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळून जाणे, असे प्रकार कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात वाढले होते.

हेही वाचा – ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या

संध्याकाळच्या वेळेत नागरिक कामावरून घरी परतले की रिक्षा वाहनतळावर जात असताना काही जण मोबाईलवर बोलत असतात या संधीचा गैरफायदा घेत त्यांच्या हातामधील मोबाईल हिसकावून पळून जाण्याचे प्रकार वाढले होते. या मोबाईल चोरीच्या वाढत्या तक्रारी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. मोबाईल चोरीच्या या वाढत्या घटनांचा विचार करून लोहमार्ग पोलीस आयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे यांनी पोलीस पथकाला फलाटावर येऊन मोबाईल चोऱ्या करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांनी कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बारकाईने तपासून संबंधित चोरट्यांचा शोध सुरू केला होता.

कल्याण रेल्वे स्थानकात पोलिसांची गस्त चालू असताना फलाटावर एक इसम बराच उशीर घुटमळत असल्याचे पोलिसांना दिसले. साध्या वेशातील पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. त्या इसमाला पोलिसांनी फलाटावर काय काम आहे. आपणास कोठे जायचे आहे, असे प्रश्न केले. त्या इसमाला त्याचे नाव विचारले त्याने प्रताप डोके नाव असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांना उत्तर देताना इसम गडबडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली. प्रताप डोके याने कल्याण रेल्वे स्थानकात एका प्रवाशाचा मोबाईल चोरला असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – ठाणे : ९९ कोटी रुपयांचा आरटीई शुल्क परतावा थकीत !

पोलिसांनी प्रताप याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून एकूण सहा मोबाईल त्याने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी चार मोबाईल त्याच्याकडून हस्तगत केले आहेत. उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, हवालदार महेंद्र कार्डिले, राम जाधव, स्मिता वसावे, अमोल अहिनवे, सोनाली पाटील, रवींद्र ठाकुर, रुपेश निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A man from junnar was arrested for stealing mobile phones from passengers at kalyan dombivli railway station ssb