डोंबिवली – डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे, लोढा हेवन येथील शिवाजी चौकात शनिवारी एका फळविक्रेता फेरीवाल्याने फळ विक्री हातगाडीचा आडोसा घेऊन प्लास्टिक पिशवीत लघुशंका केली. ही पिशवी कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने फळ विक्रीच्या हातगाडीवरील प्लास्टिकच्या खोक्यामध्ये कोंबली. हा किळसवाणा प्रकार एका जागरूक ग्राहकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करून समाज माध्यमांमध्ये सामायिक केला. या प्रकारावरून निळजे, लोढा हेवन परिसरातील नागरिकांनी रविवारी रात्री संताप व्यक्त केला. सुमारे एक हजाराहून नागरिकांचा जमाव रस्त्यावर उतरून या भागातील फेरीवाल्यांचे सामान रस्त्यावर फेकून दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागरिकांचा जमाव आक्रमक झाल्याने फेरीवाल्यांनी हातगाड्या, दुकाने टाकून पळ काढला. कल्याण डोंबिवली पालिकेच्या ई प्रभागाच्या अंतर्गत हा भाग येतो. फेरीवाला हटाव पथकाचे या फेरीवाल्यांना आशीर्वाद असल्याने फेरीवाले निळजे, लोढा हेवन, पलाव भागातील गावदेवी, शिवाजी चौक, गृहसंकुलांच्या प्रवेशव्दार, अंंतर्गत रस्त्यांवर व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या.

हेही वाचा – डोंबिवली जवळील पिसवलीत राहुलभाई पाटीलच्या गुंडांची दहशत

रविवारी रात्रीचा फेरीवाल्याचा किळसवाणा प्रकार पाहून रहिवासी रस्त्यावर उतरल्याचे समजताच मनसेचे कल्याण ग्रामीणचे अध्यक्ष विनोद पाटील, मानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्री उशिरा कारवाईसाठी आलेल्या पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकातील पथकप्रमुखाला फैलावर घेतले. पालिका कामगारांच्या आशीर्वादाने हे फेरीवाले या भागात ठाण मांडून आहेत. हे फेरीवाले पालिकेच्या ई प्रभागाने कायमस्वरुपी हटविले नाहीतर मात्र लोढा हेवनमधील रहिवासी आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्रितपणे कायदा सुव्यस्थेचा विचार न करता फेरीवाल्यांना हटविण्याची मोहीम हाती घेतील, असा इशारा मनसेचे विनोद पाटील यांंनी पालिका पथकप्रमुखाला दिला.

फेरीवाल्याच्या किळसवाण्या प्रकाराने नागरिक संतप्त झाले होते. या भागातील तणावाने लोढा हेवन भागातील पोलीस बंदोबस्त वाढविला होता. लोढा हेवन, निळजे शिवाजी चौक, गावदेवी चौक भागात नागरिकांनी फेरीवाल्यांचे ठेले लोटून दिल्याने फळांचा रस्त्यांवर सडा पडला होता. पिशवीत लघुशंका करणाऱ्या फेरीवाल्याचा नागरिक शोध घेत आहेत.

पालिकेची कारवाई

सोमवारी सकाळी ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप फेरीवाला हटाव पथकाचा ताफा घेऊन निळजे लोढा हेवन भागात आले. सोबत जेसीबी होता. फेरीवाल्यांचे पावसाळी निवारे, लोखंडी, लाकडी मंच, पदपथाला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या पथकाने जमीनदोस्त केल्या. रात्रीतून पाचहून अधिक टेम्पो साहित्य जप्त केले.

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ए वर लोखंडी रोधक, रेल्वे मार्गातून जाणाऱ्या प्रवाशांचा मार्ग बंद

निळजे लोढा हेवन, पलावा परिसरात यापुढे एकही फेरीवाला दिसणार नाही याची काळजी कल्याण डोंबिवली पालिकेने घ्यावी. या फेरीवाल्यांमुळे रहिवासी त्रस्त आहेत. किळसवाणे प्रकार या भागात करत आहेत. पालिकेने या फेरीवाल्यांना हटविण्याची दैनंदिन कारवाई सुरू ठेवावी, अन्यथा मनसे कार्यकर्ते रहिवाशांसह फेरीवाल्यांविरुद्ध रस्त्यावर उतरतील. – विनोद पाटील, अध्यक्ष, मनसे कल्याण ग्रामीण विधानसभा.

लोढा हेवन, निळजे परिसरात एकही फेरीवाला दिसणार नाही अशा पद्धतीने या भागात दैनंदिन कारवाई केली जाईल. – चंद्रकांत जगताप, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens evicted hawkers from nilje lodha heaven in dombivli ssb