लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: ठाणे शहरातील बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागेवर कामगारांना घरे मिळावी तसेच त्याठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी सत्ताधारी पक्षातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शनिवारी वर्तक नगर येथील एका खासगी कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. त्याचवेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे दिलीप बारटक्के यांनीही कार्यकर्त्यांसह कंपनीमध्ये घोषणाबाजी केली. येथील स्थानिकांना काम मिळावे म्हणून मी दोन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. त्यानुसार स्थानिकांना कामे मिळालेली असल्याचा दावा त्यांनी केला. सरनाईक आणि बारटक्के या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने शिंदे गटामधील गटबाजीचे दर्शन झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

वर्तकनगर येथील एक बंद पडलेली खासगी कंपनी असून त्याठिकाणी विकासकाच्या माध्यमातून इमारत बांधकाम सुरु आहे. शनिवारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांच्यासह शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन केले. तसेच मुंबईतील गिरणी कामागारांप्रमाणे ठाण्यातही बंद पडलेल्या कंपनीतील कामगारांना घरे मिळावी, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला पाहिजे या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.

त्यानंतर लोकमान्यनगर भागातील माजी नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी कंपनीच्या आवारात कार्यकर्त्यांसह जमून घोषणाबाजी केली. आम्ही स्थानिक असून दोन वर्षापूर्वीच येथील बांधकामासंदर्भाची कामे घेतल्याचा मुद्दा बारटक्के यांनी उपस्थित केला. तसेच आम्ही स्थानिकांना न्याय देण्याचे काम केले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मागील कित्येक वर्षापासून याठिकाणी काम मिळविण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला होता. त्यानुसार येथील स्थानिकांना रोजगार मिळाला असल्याचेही ते म्हणाले. या दोन्ही आंदोलनांमुळे शिंदे गटातील गटबाजी उघड झाली आहे.

सरनाईक विरुध्द बारटक्के

लोकमान्यनगर भागात बारटक्के हे पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत एकाच प्रभागात नगरसेवक होते. बारटक्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. सरनाईक आणि बारटक्के यांच्यामध्ये पूर्वीपासूनच मतभेद असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर याला विराम लागेल अशी अपेक्षा असताना त्यांच्यात पुन्हा वाद पेटल्याचे दिसत आहे.

विकासकाने त्याच्या एका कर्मचाऱ्याला गरज पडल्यास आंदोलकांवर गोळीबार केला असे सांगितल्याचा आरोप सरनाईक यांच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर सरनाईक हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार देण्यासाठी गेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy between pratap sarnaik and dilip bartakke mrj