सागर नरेकर-निखिल अहिरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे: गुजरातमध्ये झालेल्या धवलक्रांतीनंतर भारत दूध उत्पादनात झेप घेत जगाच्या नकाशावर आला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील उमरोली हे गावही सध्या जिल्ह्यात धवलक्रांतीच्या उंबरठय़ावर आहे. दूध विक्री या संपूर्ण गावाचा प्रमुख व्यवसाय असून दूध संकलनात गावाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे गावाची ही क्षमता ओळखून आता गावातच दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. देशातील अग्रगण्य दूध कंपनीनेही या गावात संकलन केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात मुरबाडमधील उमरोली जिल्ह्यातील धवलक्रांतीची पायाभरणी करणारे गाव ठरू शकते.

राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या महिला बचत गटांसाठी विविध उपायोजना राबविण्यात येतात. दिवाळीच्या दरम्यान या बचत गटांतर्फे विविध खाद्यपदार्थाची विक्री केली जाते. या खाद्यपदार्थाची एकाच ठिकाणी विक्री व्हावी यासाठी गतवर्षी जिल्हा प्रशासनातर्फे मुरबाडमधील सरळगाव येथे विक्री महोत्सव भरविण्यात आला होता. या दरम्यान उमरोली (बु.) गावातील बचत गटाशी निगडित असलेल्या महिलांनी या महोत्सवात पनीर, तूप यांसारखे दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी आणले होते. या पदार्थाना उत्तम प्रतिसाद मिळून त्यांची चांगली विक्री झाली. यातून जिल्हा प्रशासनाला उमरोली गावात सुरू असलेल्या दूध व्यवसायाविषयी माहिती मिळाली. उमरोली हे गाव कल्याण अहमदनगर महामार्गावर सरळगावशेजारी आहे. या गावाचा प्रमुख व्यवसाय दूध विक्री आहे. बहुतांश ग्रामस्थ या व्यवसायात गुंतले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उमरोलीत जिल्हा प्रशासनाकडून दुग्ध व्यवसायाविषयी अनेक उपाययोजना राबविण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

नियोजन काय?

उमरोली गावातून प्रतिदिन सरासरी पाच हजार लिटर दूध संकलित केले जाते. गावातील आणि आसपासच्या परिसरातील विविध केंद्रांद्वारे यांची विक्री केली जाते. तर गावातील काही महिला बचत गट दुधावर प्रक्रिया करतात. यातून तूप, पनीर यांसारखे दुग्धजन्य पदार्थ तयार करून त्यांची वैयक्तिक स्तरावर विक्री करतात. यांना एकत्रित करून दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादन सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये आतापर्यंत गावातील चाळीस महिला जोडल्या गेल्या आहेत. गावाची ओळख त्यांच्या या नव्या कामावरून व्हावी तसेच अमुलच्या धर्तीवर या उत्पादनाला विशेष नाव देण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. देशातील दूध व्यवसायातील एका अग्रगण्य कंपनीला या गावात दूध संकलनाचे केंद्र सुरू करण्यासाठी आणण्याबाबत जिल्हा प्रशासनाने पाऊले टाकण्यास सुरुवात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या गावातून मोठय़ा प्रमाणात दूध संकलित केले जाते. तसेच येथील महिला बचत गटांना या कामासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत या महिलांना दूध संकलनासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

– छायादेवी शिसोदे, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण प्रकल्प यंत्रणा, ठाणे

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhawalkranti experiment administration initiative production of milk products ysh