ठाणे : ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जात असतानाच, त्यापैकी एक असलेल्या आनंद नगर ते साकेत उन्नत मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माती परिक्षणाचे काम सुरू केले आहे. यासाठी तीन हात नाका ते नितीन कंपनीपर्यंत असलेल्या हरित जनपथावर जागोजागी लोखंडी पत्रे लावून खोदाई करण्यात येत आहे. येथूनच उन्नत मार्गाची मार्गिका जाणार असल्याने कोट्यावधी रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या जनपथावर गंडांतर येण्याबरोबरच येथील वृक्षबाधित होण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील नितीन कंपनी ते तीन हात नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्चुन हरित जनपथ उभारण्यात आला आहे. २०१३ मध्ये ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेतून या जनपथाची उभारणी करण्यात आली आहे. रस्त्यालगत असलेल्या पदपथामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते आणि अशा अपघातात नागरिकांना जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास सुरक्षित तसेच अधिक सुकर व्हावा, या उद्देशातून हरित जनपथ तयार करण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंस हिरवळ आणि मधोमध पदपथ, अशा प्रकारे हरित जनपथांची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या या जनपथावर सकाळ आणि सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी नागरिक येतात. या नागरिकांचा संख्या मोठी आहे. सकाळच्या सुमारास बहुतेक ठाणेकर फेरफटका मारताना जनपथावरील हिरवळीचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. तसेच जनपथ हे शहराचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मात्र, या आनंद नगर ते साकेत उन्नत मार्गाच्या उभारणीत हरित जनपथवर गंडांतर येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ठाणे -बोरिवली भुयारी मार्ग, खाडी किनारी मार्ग तसेच इतर मार्गिक उभारण्यात येत आहे. अशाचप्रकारे आनंद नगर ते साकेत उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या मार्गाची उभारणी केली जाणार आहे. या मार्गासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून माती परिक्षणाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी हरित जनपथावर जागोजागी लोखंडी पत्रे लावून खोदाई करण्यात आली आहे. हरित जनपथामधून आनंद नगर ते साकेत उन्नत मार्गाची मार्गिका जाणार आहे. यामुळे हरित जनपथ बाधित होणार असून त्याचबरोबर येथील अनेक वृक्ष बाधित होणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्याशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

असा आहे प्रकल्प

पूर्व द्रुतगती महामार्गावर आनंद नगर ते साकेत उन्नत रस्ता

लांबी : ८.२४ किमी

आनंद नगर ते साकेत संकुलादरम्यान ४० मीटर रुंद (३ ३ मार्गिका) उन्नत रस्ता

कंत्राटदार : मे. जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड

प्रकल्प खर्च : ११.८४७.७२ कोटी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane city elevated road from anand nagar to saket excavation started green belt affected asj