लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा छळ, गैरवर्तवणूक यासर्व गोष्टींना आळा बसावा यासाठी व्यावसायीक आस्थापनांमध्ये आणि संबंधित कार्यालयांममध्ये महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक होते. मात्र जिल्ह्यांतील बहुतांश आस्थापनांमध्ये संबंधित कार्यालयांकडून समितीची स्थापना करण्यात आली नसल्याचे दरम्यानच्या काळात निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर आता या महिला तक्रार समितीची नोंदणी सरकारच्या ” SHE BOX ” पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सर्व खासगी आस्थापनांना सूचना देण्यात आल्या आहेत.
कार्यालयीन ठिकाणी सह कर्मचाऱ्यांकडून महिलांची छळवणूक झाल्याचे, गैरवर्तनाचे प्रकार अनेकदा समोर येत असतात. यातील बहुतांश महिला पोलिसी कारवाई, प्रक्रिया तसेच नोकरी जाण्याची भीती या सर्व गोष्टींमुळे याबाबतच्या प्रकाराची तक्रार करण्यास धजावत असतात. यामुळे छळवणूक करणाऱ्यांचे अधिक फावते. याच पार्श्वभूमीवर हे सर्व प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनीयम) अधिनियम, २०१७ व नियम २०१८ अंतर्गत सर्व दुकाने व आस्थापनांमध्ये महिला तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, महिला अधिकारी अथवा कर्मचारी तसेच जिल्हा महिला बालविकास विभागातील संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश असतो.
महिलाना त्यांच्यासमवेत कार्यलयात होणाऱ्या गैरवर्तनाबाबत खुलेपणाने तक्रार करता यावी आणि संबंधिताला शिक्षा मिळावी या हेतूने समिती स्थापन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयांमध्ये समिती स्थापन करण्यात आले नसल्याचे दरम्यानच्या काळात निदर्शनास आले होते.
जिल्ह्यातील जी दुकाने, व्यवसायिक आस्थापनांमध्ये १० कर्मचारी कार्यरत आहे व त्यात एक किंवा त्यापेक्षा जास्त महिला आहे, अशा सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींकरीता अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. याच पार्श्वभूमीवर याची अंमलबजावणी आस्थापेनेतील अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी ” SHE BOX PORTAL ” वर नोंदणी करण्यासाठी केंद्र शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी ” SHE BOX PORTAL ” वर नोंदणी करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी आवाहन केले आहे.