लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरनाथः आमदार असल्याचे भासवत बंदुक आणि बंदुकीचा परवाना देण्याच्या नावाखाली एका महिलेने आपल्या दोन सहकाऱ्यांच्या मदतीने एका ४४ वर्षीय व्यक्तीला ५ लाख २० हजारांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात वंदना मिश्रा, अभिषेक आणि फिरोज सिंग यांच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने आपल्या वाहनावर आमदार असल्याचे स्टिकरही लावले होते.

अधिकारी असल्याची बतावणी करत किंवा अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी परिचय असल्याचे सांगत नोकरीला लावण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक केल्याच अनेक प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. मात्र आता एका महिलेने आमदार असल्याचे सांगत एका व्यक्तीची ५ लाख २० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ पश्चिमेत मोहन सबरबिया परिसरात राहणाऱ्या अनमोल कुमार सिंह यांना वंदना मिश्रा यांनी आपण आमदार असल्याचे भासवले. त्यासाठी आपल्या वाहनावर आमदार नावाचे स्टिकरही लावले होते.

आणखी वाचा-मुंबई -नाशिक महामार्गावर शेतीचा माल वाहून नेणाऱ्यांना चाकू हल्ला करत लुटले

सिंह यांना बंदुकीचा परवाना हवा असल्याने त्यांनी वंदना मिश्रा यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर मिश्रा यांनी अभिषेक आणि फिरोज सिंग हे आपले स्वीय सहायक असल्याचे सांगत त्यांच्याशी ओळख करून दिली. पुढे वंदना मिश्रा या महिलेने सिंग यांच्याकडून ५ लाख २० हजार रूपये उकळले. मात्र पैसे देऊनही बंदुक तसेच परवाना मिळत नसल्याने सिंह यांनी त्यांच्याकडे पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी वंदना मिश्रा या महिलेने सिंह यांना धमकी देण्यास सुरूवात केली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सिंह यानी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून आरोपी वंदना मिश्रासह तिच्या दोन साथीदारांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in ambernath by pretending to be mla case filed against three including woman mrj