ऑनलाइन शॉपिंगचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन अशा पार्सलच्या वितरणासाठी मुंबईनंतर आता ठाणे टपाल कार्यालयाने देखील पुढाकार घेतला असून ही सेवा सोमवारपासून ठाण्याच्या मुख्य टपाल कार्यालयात देखील सुरु करण्यात आली आहे. यासाठी ठाणे टपाल कार्यालय इ कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांशी संलग्न झाले असून यासाठी दोन विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ठाणे कार्यालयात येणाऱ्या स्पीड पोस्टचे प्रमाण जास्त आहेच. मात्र ऑनलाइनने येणाऱ्या पार्सलचे प्रमाण देखील जास्त असल्याने भविष्यात ही सेवा अधिक व्यापक स्वरूपात करणार असल्याची माहिती वरिष्ठ डाकपाल यांनी दिली आहे. या सेवांमुळे पोस्ट्मनचा भार देखील कमी होणार असल्याचे या कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
धकाधकीच्या आयुष्यात प्रत्यक्ष खरेदी करण्यासाठी कोणालाही वेळ नसल्याने ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इ कॉमर्स उद्योगाला चांगलीच उभारी मिळाली आहे. ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करण्यात येणाऱ्या पार्सलच्या वितरणासाठी यापूर्वीच भारतीय टपाल खात्याने पुढाकार घेतला असून मुंबईमध्ये ३५ वाहनांच्या माध्यमातून १३ वितरण केंद्रे केवळ अशा प्रकारच्या इ कॉमर्सच्या वितरणासाठी सुरु करण्यात आली आहेत. मुंबई नंतर आता ठाणे मुख्य टपाल कार्यालयाबरोबरच ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, नवी मुंबई आणि भांडुप या ठिकाणी हि सेवा सुरु करण्यात आली आहे. ठाणे मुख्य टपाल कार्यालयाच्या अंतर्गत , संपूर्ण ठाणे शहर तसेच कळवा मुंब्रा आणि मुंब्र्याच्या आसपासची छोटी खेडी देखील येतात. या कार्यालयात इ कॉमर्सच्या माध्यमातून दररोज पार्सल येण्याचे प्रमाण हे १०० ते १२५ पर्यंत आहे. भविष्यात हे प्रमाण वाढणार असल्याने हि सर्व अधिक व्यापक स्वरूपात करणार असल्याची माहिती वरिष्ठ डाकपाल वाय. एन. मोहम्मद यांनी दिली आहे.
ठाणे टपाल कार्यालयामध्ये अशा प्रकारच्या वितरणासाठी सध्या दोन गाड्यांची सुविधा देण्यात आली असून यासाठी ४ पोस्टमनची नियुक्ती करण्यात आली आहे. पार्सल आल्यापासून केवळ सहा तासांच्या आत ग्राहकांपर्यत पार्सल पोहोचणार असल्याचा दावा टपाल कार्यालयाने केला आहे. कॉमर्समध्ये आघाडीवर असणाऱ्या अमेझॉन, मिंत्रा, स्नॅपडील अशा कंपन्याशी टायअप करण्यात आले असून मुंब्र्यामधील छोट्या छोट्या खेड्यांमध्ये ही सेवा जाणार असल्याचे टपाल कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane post office provide online shopping goods