पश्चिम लंडनमधील ग्रीनफेल या २७ मजली टॉवरला बुधवारी पहाटे आग लागली. या आगीत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. पश्चिम लंडनमधील लॅटिमेर रोडवरील लँकेस्टर वेस्ट इस्टेट या परिसरात ही इमारत आहे, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ४५ गाड्या आणि २०० जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अनेकांनी आपले प्राण वाचवण्यासाठी इमारतीतून खाली उड्याही मारल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी अनेक वृत्तवाहिनेचे पत्रकार ग्रीनफेन टॉवर शेजारी जमले होते. यावेळी बीबीसीच्या पत्रकार व्हिक्टोरिया देखील वार्तांकनासाठी आल्या होत्या. पण यावेळी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका प्रत्यक्षदर्शीची मुलाखत घेताना त्याने जे काही सांगितले ते ऐकून व्हिक्टोरियाचेही डोळे पाणावले आणि तिने मायेने या प्रत्यक्षदर्शीला मिठी मारली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिक्टोरिया जेनी नावाच्या प्रत्यक्षदर्शीची मुलाखत घेत होती. आग लागली तेव्हा एका कुटुंबाने आपल्या छोट्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांना वरून खाली फेकून दिले. कित्येकांनी या २७ मजल्याच्या इमारतीवर उड्या देखील मारल्या. यात अनेकजण गंभीर जखमी झाले. जेनी मात्र हा संपूर्ण प्रकार हतबल होऊन पाहत होता. व्हिक्टोरियाला ही सारी घटना सांगताना जेनीला अश्रू अनावर झाले. तो तिथेच रडू लागला. खरं तर वार्तांकन करताना एका पत्रकारासमोर असे अनेक प्रसंग येतात. पण या भावनिक प्रसंगाच्या वेळी स्वत:वर संयम ठेवत त्यांना वार्तांकन करायचं असतं. पण पत्रकार देखील माणूसच असतो त्यालाही भाव भावना असतात याचा प्रत्ययच यावेळी घडून आला. आणि जेनीच्या तोंडून आगीची दुर्घटना ऐकताना व्हिक्टोरियालाही रडू कोसळले, शेवटी जेनीला मिठी मारत तिने आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bbc presenter victoria derbyshire hug renfell tower resident who saw man throwing his children