हल्ली मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी काही जण भलत्याच गोष्टी करतात. त्यात रस्त्यात वाहन उभे करीत फटाक्यांची आतषबाजी करून वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा ट्रेंड पाहायला मिळतोय. त्यामुळे अनेकदा त्याचा इतरांना त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारे उत्तर प्रदेशतील नोएडामध्ये काही तरुण चक्क रस्त्याच्या मधोमध केक ठेवून अगदी दणक्यात मित्राच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करीत होते; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. या घटनेनंतर पोलिसांनी सोमवारी चार जणांना अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोएडातील सेक्टर १ मधील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीजवळ रविवारी रात्री ही घटना घडली. व्हायरल व्हिडीओमध्ये असे दिसून आले आहे की, रस्त्याच्या मधोमध एक मोठी फळी ठेवून, त्यावर अनेक केक ठेवलेले आणि त्याभोवती अनेक तरुण जमले होते. यावेळी त्यांच्या बाजूने अनेक वाहने ये-जा करीत होती. मात्र, त्यांनी रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या फळीमुळे एक प्रकारे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. व्हिडीओनुसार हे सर्व तरुण मद्यधुंद अवस्थेत होते आणि यावेळी त्यांनी रस्त्यातच फटाकेही फोडले.

पोलिसांनी भररस्त्यात वाढदिवस साजरा करणाऱ्यांना शिकवला धडा

अनेकांनी या घटनेचे फोटो व व्हिडीओ काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले. त्यानंतर व्हायरल व्हिडीओ अन् फोटोंची दखल घेत फेज-१ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी गौतम बुद्ध नगरच्या पोलिस आयुक्तालयाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भररस्त्यात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांचा चेहरा ब्लर असलेला फोटो शेअर करीत लिहिले की, फेज-१ पोलिसांनी संबंधित चार तरुणांना ताब्यात घेत त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे.

या तत्काळ केलेल्या कारवाईबद्दल युजर्सनीही पोलिसांचे कौतुक केले आहे. एका युजरने म्हटलेय की, त्वरित कारवाई केल्याबद्दल धन्यवाद! तर एका युजरने लिहिलेय की, आता हे एक सेलिब्रेशन आहे. @noidapolice चे आभार!

उत्तर प्रदेशात यापूर्वीही अशा घटना अनेकदा समोर आल्या. या वर्षी जुलैमध्ये अशाच एका घटनेत गौतम बुद्ध नगर पोलिसांनी सेक्टर-२४ पोलिस हद्दीतील एलिव्हेटेड रोडवर फटके फोडत वाढदिवस साजरा करण्यासाठी भररस्त्यात केक कापल्याप्रकरणी चार जणांना अटक केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गाझियाबादमधील एलिव्हेटेड रोडवर वाढदिवसाची पार्टी करीत गोंधळ घातल्याप्रकरणी २१ जणांना आठ आलिशान कारसह अटक करण्यात आली होती. एकंदरीत वाढदिवस साजरा करण्याच्या नव्या ट्रेंडमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birthday boy got into trouble after cutting cake on the middle of the road police arrested sjr