Heartbreaking Video : मुक्या प्राण्यांबरोबर अनेकदा विकृत घटना घडल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मुक्या प्राण्यांना सहसा प्रतिहल्ला करता येत नसल्याचा फायदा घेत काही विकृत लोक त्यांच्याबरोबर धक्कादायक कृत्य करताना दिसतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना कोलकातामधून समोर आली आहे. या घटनेत एका श्वानाला प्लास्टिकच्या पोत्यात बांधण्यात आले. यानंतर ते पोते एका ट्रेनमध्ये ठेवण्यात आले. ट्रेनमधील एका प्रवाश्याच्या नजरेस हे पोते पडले, तेव्हा त्याला पोत्यातून काही हालचाल होत असल्याचे आणि आवाज ऐकू येत असल्याचे जाणवले, यावेळी त्याने रेल्वे पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पुढे काय घडलं जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ Street dogs of Bombay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो आता अनेक सोशल मीडियावरून व्हायरल होतोय. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माणसे किती क्रूर कशी काय झाली आहेत? “इतक्या अकल्पनीय क्रूरतेतून ते कसे काय आनंद शोधू शकतात,” हा हृदयद्रावक व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्सदेखील खूप संतापले आहेत.

व्हिडीओत दिसतेय की, ट्रेनमध्ये पोलीस आणि काही लोक उभे आहेत, यातील दोन लोकं पोत्यात भरलेल्या श्वानाची सुटका करतायत. पोतं दोरीने बांधलं होत ते सोडवून ते श्वानाला बाहेर काढतात.

Street dogs of Bombay या संस्थेच्या एका टीम मेंबरने या घटनेविषयी बोलताना सांगितले की, “मला विचार करून थरथर कापायला होतयं – त्याला कचऱ्यासारखे फेकून द्यायचे होते का? माणसांनी प्राण्यांवर केलेल्या क्रूरतेचे शब्दात वर्णन करता येणार नाही. दररोज आपण गैरप्रकार, छळ आणि क्रुरतेच्या भयानक घटना ऐकतो, पण तरीही आपण जगात असे वावरतोय जसे काही घडलेच नाही. आपण कोणत्या प्रकारच्या समाजात राहतोय? अशा कृतींमधून आनंद शोधणाऱ्यांमधील माणुसकी कुठे हरवलीय? अशांना रात्री झोप कशी येते? हा केवळ प्राण्यांविरुद्धचा गुन्हा नाही; हे मानवतेवरचं एक कलंक आहे. या विरोधात तुम्ही आवाज उठवा. कारवाईची मागणी करा. मुक्या प्राण्यांचे रक्षण करा. आम्ही या घटनांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.”

सोशल मीडियावर अनेक लोकदेखील या क्रूर आणि हृदयद्रावक घटनेविषयी संताप व्यक्त करतायत, तर अनेक जण श्वानाला जीवदान दिल्याबद्दल त्या माणसाचे आभार मानत आहेत. दरम्यान, अनेकांनी या क्रूर घटनेस दोषी असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करत त्यांना कडक शिक्षा करा अशी मागणी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heartbreaking video dog found abandoned in jute sack on kolkata train people says where is humanity sjr