अनेक लोक आपल्या घरातील काही खोल्या भाड्याने देतात. शिवाय अनेकदा घरमालकांना भाडेकरूंच्या चुकीच्या कृत्यांमुळे मोठे नुकसान भोगावे लागते, त्यामुळे भाडेकरु आणि घरमालक यांच्यामध्ये काही वेळा वादही होतात. सध्या घरमालक आणि भाडेकरुशी संबंधित अशीच एक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जी वाचल्यानंतर घरमालक आपल्या खोल्या भाड्याने देताना शंभर वेळा विचार करतील यात शंका नाही. हो कारण लंडनमधील एका भाडेकरुच्या निष्काळजीपणामुळे घरमालकाचे तब्बल १५ लाखांचे नुकसान झालं आहे.
कारण घर सोडून जाताना भाडेकरूने ते नीट बंद केले नाही आणि त्यामुळे घरमालकाचे १५ लाखांचे नुकसान झालं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे नुकसान चोरीमुळे नव्हे तर कबुतरांमुळे झालं आहे. कबुतरांनी उघड्या घरात तळ ठोकला होता त्यामुळे त्यांच्या विष्ठेने संपूर्ण घर दुर्गंधीने भरले. घरमालकाने घराची अवस्था पाहिल्यावर त्याला धक्काच बसला. घरात सर्वत्र दुर्गंधी आणि घाण पसरली होती शिवाय कबुतरांनी घरातील फर्निचर देखील खराब केले होते. त्यामुळे घरातील साफसफाई आणि पेंटिंगसाठी घरमालकाला १५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
कबुतरांमुळे एका महिन्यात झाले १५ लाखांचे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार लंडनच्या बाहेरील भागात हे घर आहे, जिथे मोठ्या संख्येने कबूतर राहतात. घरमालकाने सांगितले की, भाडेकरूने घराच्या खिडक्या आणि दरवाजे नीट बंद केले नव्हते. ज्यामुळे महिनाभर घर उघडे राहिले आणि कबुतरांनी स्वयंपाकघर, दिवाणखाना, सोफा इत्यादी वस्तू खराब केल्या. त्यामुळे संपूर्ण दुर्गंधी पसरली होती आणि घराच्या भिंती, खिडक्या, ड्रॉवर सर्वच अस्वच्छ झाले होते. सर्व काही पूर्ण साफ करणे आणि फर्निचरचे कव्हर्स बदलणे यासाठी 15 लाखांपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो.
सफाई पथकाला मास्क आणि सूट घालून करावी लागली स्वच्छता –
घराची परिस्थिती पाहून घरमालकाने ‘लंडन नेटवर्क फॉर पेस्ट सोल्युशन्स’च्या टीमला साफसफाईसाठी बोलावले. यानंतर संपूर्ण फ्लॅटची साफसफाई करण्यात आली. सफाई पथक घरात शिरताच त्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागता. तर हे घर स्वच्छ करण्यासाठी त्यांना संरक्षक सूट आणि दोन मास्क घालावे लागले. शिवाय भाडेकरुच्या निष्काळजीपणामुळे घरमालकाचं झालेलं नुकसान पाहून सफाई पथकालाही धक्का बसला.
घरमालक म्हणतो की, हे सर्व त्याच्यासाठी दुःखदायक आहे. कोणत्याही व्यक्तीला आपले घर अशा अवस्थेत पाहणे हृदयद्रावक आहे. घरमालक भाडेकरूंवर पूर्ण विश्वास ठेवतात आणि म्हणून त्यांचे घर त्यांच्याकडे सोपवतात. त्या बदल्यात घराची व त्यातील वस्तूंची काळजी घेण्याची अपेक्षा असते परंतु काही भाडेकरू घर सोडताना साधी स्वच्छतेचीही काळजी घेत नाहीत.