मुंबई:  राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा तयार करण्यात येत असून ‘आता रडायचं नाही, लढायचं’..अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त होण्यासाठी मंगळवारी साद घातली.  विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अतिवृष्टीवरील चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना उद्देशून लिहिलेले पत्र वाचून दाखविले.  महाराष्ट्र लढवय्यांचा.. कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे. भारताच्या सीमेवर डोळय़ात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वत:चेच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची आणि देशाची भूक भागवण्याचेही काम करताहात.  म्हणून मराठी मातीवर पहिला हक्क शेतकरी बांधवांचा आहे, असे भावनिक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना मन कासावीस होऊन जाते, तुमच्यातले काही शेतकरी बांधव अनेक संकटांतून सावरताना थकून जातात आणि आत्मघाताचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून मात्र एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जाते.  आपल्याच घरातले कुणी आपण गमावल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.

 तुम्ही आहात तर  छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेडय़ापाडय़ातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं..’ त्याप्रमाणे तुम्ही खचून न जाता  तुमचा तोलामोलाचा जीव वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका. आत्महत्या करू नका, अशी भावनिक साद शिंदे या वेळी घातली.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde emotional letter to farmers of maharashtra zws