वसई : चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याच्या संदर्भात राज्य शासनाकडून हालचाली सुरू होऊ लागल्या आहेत. नाव बदलले जाणार असल्याने वसईतील ख्रिस्ती संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी याला विरोध दर्शविला आहे. येथील जागा पूर्वी मुंबईचे मूळ रहिवासी असलेले ईस्ट इंडियन ख्रिश्चन समाजाबरोबरच आगरी, कोळी, भंडारी इत्यादी समाजाच्या मालकीच्या होत्या.
रेल्वेने येथील समाजाच्या जागा घेऊन रेल्वेचा विस्तार केला आहे. या जागी व जवळपास चर्च होते. परंतु रेल्वे स्टेशन उभारण्यासाठी ते इतरत्र हलविण्यात आले व यामुळेच तेथील रेल्वे स्टेशनला चर्चगेट नाव देण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. नाव बदलणे म्हणजे मुंबईचे मूळ मालक असलेले हजारो स्थानिक समाजाचा अनादर करण्यासारखे असल्याचे वसईचे चार्ली रोझारियो यांनी सांगितले आहे. शासनाने चर्चगेट स्थानकाचा इतिहास लक्षात घेता मुंबईतील मूळ मालक असलेल्या हजारो समाजाचा योग्य तो आदर राखून चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नाव बदलू नये अशी मागणीही चार्ली रोझारियो यांनी केली आहे.