वसई: वसईच्या पापडी येथील पुरातन तलावात भराव टाकून पुल तयार केला जात असल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे पुलाच्या सौदर्याला बाधा येऊन पुलाचे क्षेत्रफळ कमी होण्याची शक्यता आहे. एकीकडे तलावाचे संवर्धन करणे गरजेचे असताना दुसरीकडे तलावात पूल कशासाठी असा सवाल पर्यावरणवाद्यांनी केला आहे.

वसई पश्चिमेला पापडी येथे पुरातन तलाव आहे. हा तलाव सुमारे दिडशे वर्ष जुना आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेला हा प्रशस्त तलाव पापडीची ओळख बनला आहे. काही वर्षांपूर्वी पालिकेने या तलावाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर तलावाचे क्षेत्रफळ कमी झाले होते. आता पालिकेने तलावाच्या मध्यभागी भराव टाकून पूल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.या तलावाजवळ जुने हनुमान मंदिर आहे. रुस्ता रुंदीकरणात हे मंदिर तलावात स्थलांतरीत केले जाणार असल्याने पूल तयार केला जात आहे. यामुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तलावातून ये-जा करण्यासाठी आम्ही हा पूल बांधत आहोत. त्यासाठी सध्या माती भराव केला जात आहे. पूलाच्या कामाचे खोदकाम करण्यासाठी हा भराव करण्यात आला आहे. नंतर भराव काढला जाईल, असे पालिकेेचे कार्यकारी अभियंता प्रकाश साटम यांनी सांगितले.

हेही वाचा : “आदित्य ठाकरेंच्या कपाळावर ‘मेरा बाप नपुंसक है’चा शिक्का”, नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य

मुळात पुलाची गरज काय? स्थानिकांचा सवाल

पाणथळ स्थळे (संवर्धन वव्यवस्थापन) नियम-२०१७ नुसार पाणथळ स्थळांच्या यादीमधील जलाशये व जलाशयांच्या परिसरात कायमस्वरूपी बांधकाम करता येत नाही. नागपूर येथील फुटाळा तलावाला पाणथळ स्थळाचा दर्जा दिला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नागपूर फुटाळा येथील तलावात बांधकाम करण्यावर बंदी घातली होती. पापडी तलाव पाणथळाचा दर्जा नसला तरी तो पुरातन तलाव आहे. त्यामुळे या निर्देशाच्या अनुषंगाने या तलावातही बांधकाम करू नये, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. तलावाच्या पलिकेड तयार होणार्‍या गगनचुंबी इमारतीसाठी तर या पूलाचा घाट घातला जात नाही ना अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.

हेही वाचा : स्थानिक माणूस टिकविण्यासाठी बविआला पाठिंबा, हरित वसईचे अध्यक्ष मार्कुस डाबरे यांची घोषणा

वसई मधील सर्व तलाव सुशोभीकरण व विकासच्या नावाखाली संपवून टाकले जात आहे, असा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते मॅकेन्झी डाबरे यांनी केला आहे. वसईच्या गिरीज गावातील तलाव अशाप्रकारे नष्ट करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील धनिव येथील तलावातून चक्क मालवाहू रेल्वे साठी मोठे पिलर टाकून मार्गिका तयार केल्याचेही डाबरे यांनी सांगितले. तलावात पुल बनवावा अशी मागणी कुणी केली होती? या पुलाचा वापर प्रेमी युगूल, नशेबाज आणि भिक्षेकरी यांच्यासाठीच होईल असे वसईतील सामाजिक कार्यकर्ते शंकर बने यांनी सांगितले.