अमेरिकेतली ट्रम्प प्रशासनाने स्वीकारलेल्या आयात करवाढीच्या ‘जशास तसे’ या धोरणाने जगभरातील महत्त्वाच्या देशांमधील भांडवली बाजार सोमवारी कोसळले. ज्या अमेरिकेच्या हितासाठी आपण हे करत असल्याचा दावा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करत आहेत, त्या अमेरिकन भांडवली बाजारालाही तब्बल सहा लाख कोटी अमेरिकन डॉलर्सचा फटका बसला. आणि जगभरातील भांडवली बाजार गडगडले! ट्रम्प हे मोदी यांचे मित्र असल्याने भारताला फारसा फटका बसणार नाही, अशी काहींची अटकळ होती. मात्र ते सपेशल चुकीचं होतं, हे सिद्ध झालं आहे. ट्रम्प प्रशासनाचा हा आयातशुल्काचा धडाका असाच सुरू राहिला तर भारतालाही याचा जोरदार फटका बसेल आणि जगाचा प्रवास आर्थिक मंदीच्या दिशेने सुरू होईल. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्नही एक टक्क्याने घसरेल. त्यानंतर ‘अगली बार ट्र्रम्प सरकार’ असे म्हणण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही!