रेश्मा भुजबळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पदार्थ विज्ञान, ‘सरफेस सायन्स’ आणि नॅनो तंत्रज्ञान या विषयांवर ३०० हून अधिक शोधनिबंध, १३०० हून अधिक सायटेशन्स, एक पेटंट, ३५ हून अधिक वर्षांचा संशोधन आणि अध्यापनाचा अनुभव, ४० हून अधिक डॉक्टरेट प्राप्त केलेले विद्यार्थी आणि ७ पुस्तकांचे लेखन यामुळे देशातील नॅनो तंत्रज्ञानातील प्रमुख वैज्ञानिक अशी ओळख असणाऱ्या आणि नॅनो तंत्रज्ञान या विषयाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम ओळख करून देणाऱ्या संशोधक डॉ. सुलभा कुलकर्णी आहेत यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा’.

स्त्री शिक्षणाचे प्रमाणच अत्यल्प असलेल्या काळात विज्ञानाचा अभ्यास करून त्यात संशोधन करण्याची मनीषा बाळगणाऱ्या स्त्रिया खूपच कमी. अशा काळात डॉ. सुलभा कुलकर्णी या पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. पीएच.डी. झाल्यावर १९७६ मध्ये जर्मनीच्या म्युनिच येथील टेक्निकल विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल संशोधन करण्यासाठी गेल्या. जर्मनीत पोस्ट डॉक्टरल करताना २५ विद्यार्थ्यांमध्ये त्या एकटय़ाच स्त्री होत्या.

१९७९ मध्ये म्युनिचहून पुण्याला परतल्यावर सुलभा कुलकर्णी यांनी पुढील ३२ वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अध्यापन आणि संशोधन केले. सावित्रीबाई फुले विद्यापीठात नॅनो तंत्रज्ञान विभाग सुरू करण्याचा मान डॉ. सुलभा कुलकर्णी यांना जातो. आपण जर संशोधन आपल्या देशात येऊन केले तर त्याचा फायदा आपल्या लोकांना होतोच शिवाय अनेक संशोधक विद्यार्थीही तयार होतात, असे त्यांचे मत आहे. म्हणूनच परदेशात शिक्षण घेऊनही तिथे न स्थिरावता त्यांनी भारतात संशोधनासाठी परत येणे स्वीकारले.

नॅनो मीटर म्हणजे मीटरचा एक अब्जावा भाग. इतक्या सूक्ष्म गोष्टीचे संशोधन तेही साधारण ३० वर्षांपूर्वी नक्कीच वेगळेपण होते. डॉ. सुलभा कुलकर्णी सांगतात, ‘मला लहानपणापासूनच अवघड आणि न जमणाऱ्या गोष्टी करून पाहायला आवडते. त्यातूनच विज्ञानाची आवड वाढली. मी जेव्हा संशोधन क्षेत्रात आले तेव्हा सर्व जण ज्या विषयांत संशोधन करतात तेच मी करावे असे वाटले नाही. त्यातूनच मग नॅनो तंत्रज्ञानाच्या संशोधनाकडे आले. मळलेल्या पायवाटांवर न जाता वेगळय़ा वाटा चोखाळल्या.’

डॉ. सुलभा कुलकर्णी यांचे नाव अधिक चर्चेत आले ते त्यांच्या ‘अल्ट्रा लाइटवेट एरोजेल’मधील संशोधनामुळे. हा पदार्थ हलका आणि नाजूक असल्याने त्याची ताकद वाढविण्याविषयीचे संशोधन त्यांनी केले. ज्याचा उपयोग आज मोठय़ा प्रमाणात अवकाशयान, ऑटो उद्योगांत तसेच संरक्षण क्षेत्रात प्रामुख्याने केला जातो. या संशोधनाबरोबरच धातूंचा अनेक-स्तरी मुलामा, धातूंचे जाड मुलामे, वायुरूप पदार्थ आणि घनपदार्थ यांच्यामधील आंतरप्रक्रिया, अर्धसंवाहक या अन्य विषयांवरही डॉ. सुलभा कुलकर्णी यांनी संशोधन केले आहे. तसेच या विषयांवर शोधनिबंध लिहिले आहेत. अलाहाबाद, बंगळूरु, दिल्ली अशा विविध ठिकाणी नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमीच्या त्या फेलो होत्या. तसेच आशिया पॅसिफिक मटेरिअल्स सोसायटीच्या आणि इराणच्या नॅनोतंत्रज्ञान सोसायटीच्याही मानद फेलो होत्या.

नॅनो तंत्रज्ञान हा विषय अगदी २००७ पर्यंत तितकासा रुळलेला विषय नव्हता, त्यामुळे त्याविषयीचे अध्यापन करताना लागणाऱ्या नोट्स डॉ. कुलकर्णी यांनी त्यांच्या स्वत:च्या संशोधनावरून तयार केलेल्या असत. त्यातूनच ‘नॅनो टेक्नॉलॉजी प्रिन्सिपल्स अ‍ॅन्ड प्रॅक्टिसेस’ या त्यांच्या पुस्तकाने आकार घेतला. हे पुस्तक नॅनो तंत्रज्ञान शिकणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे.

आपल्याकडे विज्ञान सोपे आणि समजेल अशा भाषेत शिकवले तर त्याचा फायदा नक्कीच मुलांचे कुतूहल वाढण्यात होऊ शकतो. त्यातून मुलांना त्यात आवड निर्माण होऊन भावी वैज्ञानिक तयार होऊ शकतील असे त्यांना वाटते. त्यातून मुलांसह सर्वानाच उपयोगी होईल असे ‘कार्बन एक विस्मयकारक मूलद्रव्य’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. मराठी आणि इंग्रजीतील सात पुस्तके त्यांनी स्वतंत्र आणि सहलेखकांसह लिहिली आहेत. विज्ञानाची तसेच नॅनो तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आणि प्रसार करण्यासाठी त्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन व्याख्याने देत असतात. त्यासाठी त्या अगदी खेडोपाडीही जात असतात.

सध्या त्या पुण्यातील ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था’ (आयसर) येथे भौतिकशास्त्राच्या अतिथी प्राध्यापक आहेत. तत्पूर्वी त्या २०१०-११मध्ये राजस्थानमधील बनस्थळी विद्यापीठात उपकुलगुरू म्हणून कार्यरत होत्या. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांमधील संस्थांच्या आणि विद्यापीठांच्याही त्या अतिथी प्राध्यापक आहेत. मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, कोलकाता विद्यापीठ, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी, जेएनयू दिल्ली, आयआयएस्सी व जेएनसीएसआर बंगळूरु अशा संस्थांतील पीएचडी थिसीससाठी त्या परीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी ४० हून अधिक विद्यार्थ्यांना डॉक्टरेट प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

संशोधन क्षेत्राचा विचार केला तर स्त्रियांचे प्रमाण अद्याप कमीच असल्याचे जाणवते. स्त्रियांना कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे संशोधन क्षेत्रासाठी द्यावा लागणारा अमर्याद वेळ त्यांना देता येत नाही, हे त्यांचे निरीक्षण. ‘भारत सरकारच्या स्टँडिंग कमिटी फॉर प्रमोटिंग विमेन इन सायन्स’च्या सदस्य असल्याने स्त्रियांचे संशोधन थांबणार नाही वा अल्प विश्रांतीनंतर पुन्हा संशोधन सुरू करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव मटेरियल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया, ‘भारतीय स्त्री शक्ती’चा ‘विमेन अँड टेकनॉलॉजी इनोव्हेशन अवॉर्ड’, विद्या महामंडळ चा ‘लोकशिक्षण पुरस्कार’या पुरस्कारांद्वारे करण्यात आला आहे. या सगळय़ात त्यांच्या कुटुंबाचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे होते याचा त्या आवर्जून उल्लेख करतात.

एक संधी हुकली तर दुसरी येते किंवा एक दार बंद झाले तर दुसरे उघडते, या तत्त्वाचे अनुसरण करत असल्याने त्या सातत्याने पुढेच पाहत आल्या आहेत. त्यामुळे त्या कधी निराश झाल्या नाहीत किंवा संशोधनाच्या या वाटेवर त्यांनी सातत्याने नवीन काय करता येईल हे पाहिले आणि हा नावीन्याचा ध्यासच त्यांच्या उत्साहाचा प्रमुख ऊर्जास्रोत आहे. ७३ वर्षांच्या डॉ. सुलभा आजही तारुण्यातल्या उत्साहाने अव्याहतपणे वेगवेगळय़ा विषयांचे संशोधन आणि संशोधनासाठी मार्गदर्शन आणि अध्यापन करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड आणि कुतूहल निर्माण व्हावे, तसेच जास्तीत जास्त मुलींनी या क्षेत्राकडे वळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना भरभरून यश येवो ही शुभेच्छा!

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diffusion nanotechnology india surface science students ysh
First published on: 01-10-2022 at 00:02 IST