दि पंजाब नॅशनल बँकेत १९.५० कोटींचा अपहार केल्याप्रकरणी अटकेत असलेले बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक रमेशचंद्र नारायणदत्त तिवारी (वय ५२, रा. विमाननगर,पुणे) यांच्यासह सुभाष वसंतराव भोसले (वय ५७), जयवंत सुभाष भोसले (वय ३५), रवींद्र सुभाष भोसले (वय ३२, रा.  पंढरपूर), विनायक सुभाष सोनवणे (वय ४२,रा. कोल्हापूर) आदी आठ जणांना सोलापूरचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही.पाटील यांनी प्रत्येकी एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्त करण्यात आदेश दिला.
याप्रकरणाची माहिती अशी की, पंढरपूर येथील एक्सेल कृषी प्रक्रिया प्रा. लि. या नावाच्या कंपनीने पंजाब नॅशनल बँकेच्या सोलापूरच्या कस्तुरबा मार्केट शाखेतून धान्यापासून मद्यनिर्मिती प्रकल्प उभारणीसाठी तसेच आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी १९ कोटी ५० लाखांचे कर्ज घेतले होते. त्यासाठी यंत्रसामग्रीचा पुरवठा करण्याकरिता गुजरातच्या वापी येथील नॉर्दन इंडिया अल्कोब्रू सिस्टिम यांच्याशी एक्सेल कंपनीने करार केला होता. सदर यंत्रसामग्री गहाणखताने पंजाब नॅशनल बँकेला लिहून देण्यात आली होती. दरम्यान, बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मद्यनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्याठिकाणी कर्ज पुरवठय़ाच्या रकमेप्रमाणे प्रगती दिसून आली नाही. प्रकल्प बंद अवस्थेत होता. त्यातील यंत्रसामग्रीदेखील नसल्याचे आढळून आले. प्रकल्पाची यंत्रसामग्री बँकेस तारण असताना एक्सेल कंपनीने कोल्हापूरच्या श्री सिध्दिविनायक प्रा. लि. कंपनीला परस्पर विकली. तसेच बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक रमेशचंद्र तिवारी यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न करून घेता कर्जवितरण केल्याचे दिसून आले. त्यामुळे बँकेचे मुख्य व्यवस्थापक एन. सी. गर्ग यांनी केंद्रीय गुन्हे विभागाकडे (सीबीआय) सोलापूरच्या सदर बझार पोलीस ठाण्यामार्फत १९ कोटी ५० लाखांचा अपहार झाल्याप्रकरणी फिर्याद नोंदविली होती. यात एक्सेल कंपनीचे संचालक सुभाष भोसले, जयवंत भोसले व रवींद्र भोसले या तिघा संचालकांसह बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक रमेशचंद्र तिवारी, वापीचे परेश कनसारा व यशराज बर्मन तसेच कोल्हापूरच्या सिध्दिविनायक कंपनीचे संचालक विक्रांत सोनवणे आदी आठ जणांना आरोपी करण्यात आले होते. तेव्हापासून हे आरोपी अटकेत होते. या आरोपींनी अ‍ॅड.मिलिंद थोबडे यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असून त्यात कागदोपत्री पुरावा असून तो बँकेकडे पूर्वीपासून उपलब्ध असल्याने आरोपींना न्यायालयीन कोठडीची गरज  नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. थोबडे यांनी केला. बँकेने एक्सेल कंपनीविरूध्द अपहाराची रक्कम वसूल होण्यासाठी दिवाणी दावा दाखल केला असल्याच्या बाबीकडेही अ‍ॅड. थोबडे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी एक लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सरकारतर्फे सीबीआय तपास अधिकारी वारंग यांनी काम पाहिले.   

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 8 accused of financial scam get bail with conditions