उरण नगरपालिका परिसरातील नालेसफाईसाठी १९ मे रोजी निविदा काढण्यात आलेली असून पंधरा दिवसांत नालेसफाईची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे उरणच्या नालेसफाईला जून महिना उजाडणार असून उशिरा होणाऱ्या नालेसफाईमुळे सफाई होणार का, असा सवाल उपस्थित करून नालेसफाईला दिरंगाई होणार असल्याने शहरातील नाले तुंबण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात नगरपालिका अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आचारसंहितेमुळे निविदा काढता न आल्याने ही दिरंगाई होत असल्याचे कारण पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले.
मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली असून समुद्रसपाटीपासून खाली असल्यामुळे, भरतीच्या वेळी उरण शहरात पाणी शिरत असल्याने पावसात शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याने घरांमध्ये पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्हावा यासाठी नालेसफाई करणे आवश्यक आहे. यासाठी उरण पालिकेच्या सफाई विभागाच्या माध्यमातून शहरातील काही नाल्यांची स्वच्छता करण्यात आलेली आहे. मात्र ही सफाई केवळ पंचवीस टक्के असून पावसाळा काही दिवसांवर आला असताना पंच्याहत्तर टक्क्य़ांपेक्षा अधिक नाले सफाई बाकी आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आलेली आहे. असे असले तरी कंत्राटदाराने काम सुरू केलेले नव्हते. त्यामुळे नालेसफाईच्या कामाला कधी सुरुवात होणार, याबाबत उरणच्या नागरिकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न झाल्याने शहरातील रस्त्यावर पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deferment in cleaning of the sewer