‘फॅन्ड्री’ या मराठी चित्रपटातील एका दृश्यामध्ये आक्षेपार्ह छायाचित्र, विटंबनात्मक संवाद दाखविल्याचा आरोप करीत ५०-६० युवकांच्या गटाने शहरातील चित्रपटगृहावर, तसेच वाहनांवर दगडफेक केली. या बरोबरच शहरातील छोटय़ा व्यावसायिकांच्या गाडय़ांची नासधूस केली. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास समतानगर भागात हा प्रकार घडला.
पोलिसांनी सांगितले की, समतानगर परिसरातील ‘श्री’ चित्रपटगृहात शुक्रवारपासून फॅन्ड्री हा मराठी चित्रपट दाखविण्यात येत आहे. सायंकाळी ६ वाजता चित्रपटाचा तिसरा खेळ सुरू असताना सातच्या सुमारास काही युवक घोषणाबाजी करीत या सिनेमागृहाजवळ दाखल झाले. या वेळी युवकांच्या टोळक्याने चित्रपटगृहावर दगडफेक केली. तसेच येथे पार्क केलेल्या दुचाकी खाली पाडून जीप (एमएच ४ डीएन ४४६६) व मोटारीवर (एमएच २५ आर ३८६०) दगडफेक करून काचा फोडल्या. नंतर जमावाने श्री तुळजाभवानी संकुलाजवळ पार्क केलेल्या वाहनांवरही दगडफेक केली व भेळ, आईस्क्रीमची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या गाडय़ांचे नुकसान केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
माहिती कळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, उपनिरीक्षक शहाणे घटनास्थळी दाखल झाले व तोडफोडीची पाहणी केली. संशयितांची धरपकड करण्यासाठी पथके तनात केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, युवकांच्या टोळक्याने शहरातील सिनेमागृहाची तोडफोड केल्याचे वृत्त शहरात झपाटय़ाने पसरले. त्यानंतर समतानगर भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fandry picture theatre throw stone osmanabad