शाळा व वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण.. वर्गाच्या बाहेरच मिकी-माऊस, डोरो मन, छोटा भीमसह आलेली मंडळी.. कुठे विद्यार्थ्यांचे औंक्षण तर कुठे गुलाब पुष्प देऊन स्वागत.. पहिल्या दिवशी पुस्तकांचेही वाटप.. वर्गात नानाविध खेळण्याचा पसार आणि खाऊचीही रेलचेल.. पण तरीही प्रथमच शाळेत आलेल्या चिमुरडय़ांना आई-बाबांचे बोट सोडवेना.. मुलांचा उतरलेला चेहरा आणि सभोवतालची गंमत दाखविण्याची धडपड करत पालकांनी चिमुरडय़ांना शिक्षकांच्या हाती सोपवत घेतलेला काढता पाय.. सोमवारी शहर परिसरातील बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी असेच वातावरण होते.
उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजली. प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवा डबा, नवे दप्तर, वह्य़ा पुस्तकांची नवलाई असतांना आपल्या मित्र-मंडळींना भेटण्याची उत्सुकता होती. तर दुसरीकडे पूर्व प्राथमिक गटातील चिमुरडय़ांनी पहिल्यांदाच पालकांसोबत शाळेत पहिले पाऊल टाकले. नव्याची नवलाई असली तरी सारेच काही अनोळखी असल्याने त्यांच्याकडून आई-वडिलांना काही सोडवत नव्हते. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्याच्या दृष्टीने शाळांनी जय्यत तयारी केली होती. बहुतांश शाळा परिसरात सुटी संपण्याआधीच स्वच्छता अभियान राबवत वर्ग, आवार चकाचक करण्यात आले. विद्यार्थ्यांचे स्वागत नक्षीदार रांगोळी आणि औक्षणाने करण्यात आले. मुलांना शाळेचे वातावरण अल्हाददायक वाटावे यासाठी त्यांच्या आवडीच्या कार्टून मंडळींना खास आवतन देण्यात आले होते. एवढे सारे असूनही चिमुकले बावरलेच. आई-बाबा आपल्या सोबत नाही, या विचाराने चिमुकल्यांना अश्रु रोखता आले नाही. त्यांची समजूत काढताना शिक्षकांच्या नाकी नऊ आले.
शाळेचा पहिला दिवस प्राथमिक विद्यालयांमध्ये उत्साहात साजरा झाला. ‘सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत पाठय़पुस्तकांचे वितरण करण्यात आले. शहरातील जु. स. रुंग्टा हायस्कुलमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘शैक्षणिक गुढी’ उभारत नव्या शैक्षणिक वर्षांनिमित्त वर्षांरंभ उपासना करण्यात आली. महापालिकेच्या शाळांमधून वंचित विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी परिसरातून फेरी काढण्यात आली. ग्रामीण भागातील शाळांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. आंब्याच्या किंवा उपलब्ध असलेल्या पाना-फुलांची तोरणे बांधण्यात आली. ध्वनीवर्धकावर देशभक्तीपर गीते वाजविण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jun 2015 रोजी प्रकाशित
शाळेचा पहिला दिवस
शाळा व वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण.. वर्गाच्या बाहेरच मिकी-माऊस, डोरो मन, छोटा भीमसह आलेली मंडळी.. कुठे विद्यार्थ्यांचे औंक्षण तर कुठे...
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 16-06-2015 at 02:57 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First at school in nashik