पालिकेच्या डोंबिवली ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाने एका सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळाला मंडपासाठी २२ हजार ५०० रुपये भरण्याचे सूचित केल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये खळबळ उडाली आहे. मालमत्ता, पाणीपट्टी करामध्ये नागरिकांची पिळवणूक करणाऱ्या पालिकेला आता गणपती बाप्पाला बसण्याची जागाही डोईजड झाली का असा प्रश्न संतप्तपणे गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात येत आहे.
रस्त्यावर मंडप टाकून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोपर भागातील भवानी मित्रमंडळाने ह प्रभागात अर्ज केला होता. ह प्रभागाने या गणेशोत्सव मंडळाला १५०० रुपये दराने १५ दिवसांसाठी २२ हजार ५०० रुपये भरण्याचे सूचित केले. हे दर पाहून मंडळाचे पदाधिकारी चक्रावून गेले आहेत. यापूर्वी मंडपाच्या दर चौरस मीटरला पालिका पाच रुपये दर आकारून मंडळांकडून पैसा भरणा करून घेत असे. एक दिवस ते ३० दिवसांसाठी तेवढय़ाच दराने पालिका मंडळांकडून करभरणा करून घेत होती. यावेळी ह प्रभागाने एक दिवसाचे १५०० रुपये आणि पुढील १५ दिवस मंडप ठेवायचा असेल तर दर दिवसासाठी १५०० रुपये आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरमधील भवानी मित्रमंडळाला अशा प्रकारचा भरणा करण्याचे पालिकेने सांगितले आहे. गणपती बाप्पा हा नागरिकांच्या भावनेचा प्रश्न आहे. नफा-तोटय़ाचा विचार न करता हा उत्सव साजरा केला जातो. असे असताना पालिका मंडळांकडून जिझिया कर वसूल करणार असेल तर त्याविरुद्ध सर्व गणेशोत्सव मंडळे, हिंदू संघटना संघटित होऊन आंदोलन करतील, असा इशारा मंडळ पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
याबाबत साहाय्यक आयुक्त प्रकाश ढोले, ह प्रभाग अधिकारी लहू वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc ask ganesh mandal to pay octroi tax