साक्री तालुक्यानंतर आता शिरपूर तालुक्यातही जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना-रिपाइं यांची महायुती झाली असून तालुक्यातील आठ गट भाजप तर पाच गट शिवसेना लढविणार असल्याची माहिती धुळे जिल्हा भाजपचे अध्यक्ष सुनील नेरकर यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या एकत्रित होणाऱ्या निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली.
एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षांनी आपापली राजकीय चूल वेगळी मांडण्याची तयारी सुरू केली असताना शिवसेना-भाजपने मात्र रिपाइंला सोबत घेत महायुतीचे समीकरण जुळवून आणण्यात यश मिळविल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात भाजपच्या पत्रकात संपूर्ण राज्याप्रमाणेच शिरपूर तालुक्यातील जनताही काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला व नेतृत्वाला कंटाळली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रस्थापितांना विरोध करण्यासाठी तालुक्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप-शिवसेनेत युती होणे आवश्यक असण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत होऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यातून शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी, खुर्द, वाघाडी, पळासनेर, सांगवी, रोहिणी, बोराडी, कोडीद हे आठ गट भाजप तर थाळनेर, दहिवद, वनावळ, हिताळे, अर्थे या पाच गटांमध्ये शिवसेना उमेदवार उभे करणार आहे. बैठकीला भाजपचे सुनील नेरकर, भीमसिंग राजपूत, बबनराव चौधरी, दिलीप लोहार, किशोर सिंघवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local body polls seat distribution in shirpur