चिपळूण येथे भरणाऱ्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा उद्या (शनिवारी) सायंकाळी ६ वाजता मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील असतील. प्रसिद्ध ग्रामीण कथाकार प्रा. भास्कर चंदनशीव व प्रसिद्ध कवी प्रा. विश्वास वसेकर हे डॉ. कोत्तापल्ले यांच्या साहित्यिक लेखन, कर्तृत्व व व्यक्तिमत्त्वावर बोलणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात वेळेवर हा समारंभ होईल. व्यक्ती वा संस्थांनी सहभागासाठी किमान अर्धा तास आधी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. दादा गोरे यांच्याकडे आपली नावे नोंदवावीत. रसिकांनी सोहळय़ास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मसापचे अध्यक्ष अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathwada sahitya parishad honoured kottapalle