‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे’च्या घोषणा..भजनाचे सूर..अस्थिकलश पाहून भावनाविवश होत नतमस्तक होणारे शिवसैनिक.. नाशिक व धुळे जिल्ह्यात बुधवारी सुरू झालेल्या अस्थिकलश यात्रेदरम्यान ठिकठिकाणी हेच चित्र पहावयास मिळाले. अस्थिकलशास कोणी पुष्प अर्पण करून तर कोणी नतमस्तक होत शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण केली.
सजविलेल्या रथावरून अस्थिकलश यात्रेस बुधवारी भगूर येथून सुरूवात झाली. आदल्या दिवशी शिवसैनिकांच्या आग्रहास्तव इगतपुरी, घोटी परिसरात काही कालावधीसाठी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर परिसरातून अस्थिकलश यात्रा काढण्यात आली. बुधवारी सकाळी भगूर येथील शिवाजी चौकात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी महिला मंडळातर्फे भजने सादर करण्यात आले. अस्थिकलशासमोर नतमस्तक होताना शिवसैनिकांसह सर्वसामान्यांनाही अक्षरश: गहिवरून आले. काही काळानंतर भगूर शहरातून अस्थिकलश यात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करून बाळासाहेबांना अभिवादन केले जात होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगांव असलेल्या भगूरबद्दल बाळासाहेबांना विशेष आस्था होती. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी त्यांचे अनेकदा भगूरला येणे-जाणे झाले. शिवाजी महाराजांचा पुतळाही बाळासाहेबांनी भगूरला भेट दिला होता. अशा अनेक आठवणींना भगूरकरांनी यावेळी उजाळा दिला.
अस्थिकलश यात्रेवेळी ‘शिवसेनाप्रमुख अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व स्थानिक शिवसैनिकांच्या उपस्थितीत पुढे ही यात्रा सिन्नर आणि नंतर त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ झाली. सिन्नरमध्येही यापेक्षा वेगळे वातावरण नव्हते.
गुरूवारी दिवसभर अस्थिकलश शिवसेनेच्या शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
नाशिकप्रमाणे धुळे येथेही मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवरून अस्थिकलश यात्रा काढण्यात आली. जैन धर्माचे कमलमुनीजी, माजी उपमहापौर इस्माईल पठाण, साबीर शेख, फिरोज लाला, डॉ. फारूख शेख, सत्तार शहा यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, उपमहानगरप्रमुख हिलाल माळी यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या यात्रेला सुरूवात झाली. यावेळी दर्शन घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना भावना अनावर झाल्याचे पहावयास मिळाले. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या अनेकांनी बाहेरगावाहून धुळ्यात दर्शनासाठी हजेरी लावली.
दरम्यान, नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. भ्रषष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, ग्राहक पंचायत समिती व ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यात आली.
तसेच स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवारी दुपारी चार वाजता पंचवटीतील सौभाग्य मंगल कार्यालयात श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Nov 2012 रोजी प्रकाशित
दर्शनासाठी गर्दी व नतमस्तक शिवसैनिक
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे’च्या घोषणा..भजनाचे सूर..अस्थिकलश पाहून भावनाविवश होत नतमस्तक होणारे शिवसैनिक.. नाशिक व धुळे जिल्ह्यात बुधवारी सुरू झालेल्या अस्थिकलश यात्रेदरम्यान ठिकठिकाणी हेच चित्र पहावयास मिळाले. अस्थिकलशास कोणी पुष्प अर्पण करून तर कोणी नतमस्तक होत शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-11-2012 at 04:10 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena soldiers downhead and croud for view bone pitcher