छत्रपती शिवाजी महाराज हे अल्पशा सैन्यबलाच्या जीवावर लढून गरीब कष्टकऱ्यांना जमिनीचा हक्क मिळवून देणारा राजा होता, त्यामुळेच त्यांचा आदर्श हा जगातील अनेक लढय़ांच्या नेत्यांनी समोर ठेवून त्यांना गुरू मानले असताना सरकार येथील शेतकऱ्यांनाच देशोधडीला लावत असल्याने छत्रपतींचा खरा इतिहास भावी पिढीला शिकवावा, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी व्यक्त केले. जेएनपीटी कामगार वसाहतीत आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अनेक वर्षे शेतकरी दाखल्यापासून तसेच शेतकरी असल्याच्या हक्कापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना शेतकरी दाखला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांचा सत्कार समारंभ रविवारी जेएनपीटी कामगार वसाहतीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये पार पडला. सध्याचे सरकार हे सर्वसामान्यांचा अन्न, वस्त्र, निवारा हे मूलभूत हक्क हिसकावून घेणारी धोरणे राबविणारे आहे. शेती आणि त्यावर राबणारा शेतकरी हा देशाला अन्न पुरवितो.
मात्र या सरकारने त्यालाच त्याच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम सुरू केले आहे. विविध उद्योगांसाठी भांडवलदारांच्या घशात लाखो एकर जमिनी घालून हे सरकार विकास केल्याच्या गप्पा मारणार असेल तर त्याला जाब विचारण्याची गरज असल्याचेही मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. या समारंभाला उरणचे आमदार विवेक पाटील, महाडचे आमदार भरत गोगावले, जेएनपीटीचे कामगार नेते भूषण पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर भोईर तसेच संस्थेचे पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2014 रोजी प्रकाशित
शिवाजी महाराजांचा खरा इतिहास भावी पिढीला शिकवावा
छत्रपती शिवाजी महाराज हे अल्पशा सैन्यबलाच्या जीवावर लढून गरीब कष्टकऱ्यांना जमिनीचा हक्क मिळवून देणारा राजा होता, त्यामुळेच त्यांचा आदर्श हा जगातील अनेक लढय़ांच्या नेत्यांनी समोर ठेवून त्यांना गुरू मानले असताना सरकार येथील शेतकऱ्यांनाच देशोधडीला लावत असल्याने छत्रपतींचा खरा इतिहास भावी पिढीला शिकवावा, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी व्यक्त केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-06-2014 at 06:39 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teach history of shivaji maharaj to next generation