चालण्याचे फायदे बिंबविण्यासाठी नाशिक सायक्लिस्ट या संस्थेच्या सहकार्याने रंजय बच्चन त्रिवेदी यांनी सलगपणे चालण्याचा विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू केली असून ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते येथील अनंत कान्हेरे मैदानावर आपल्या विक्रमास सुरूवात करणार आहेत.
नाशिक सायक्लिस्ट संस्थेच्या वतीने काहीतरी वेगळे करणाऱ्यांना नेहमीच साथ दिली जाते. रंजय त्रिवेदी यांनी मागील वर्षी चालण्याचा एक आगळा वेगळा विक्रम केला होता. मागील वर्षी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांनी अनंत कान्हेरे मैदानावर चालण्यास सुरूवात केली होती. दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडेसहापर्यंत ते चालतच होते. यादरम्यान त्यांनी मैदानाला तब्बल २०८ फेऱ्या मारत १६५ किलोमीटर अंतर कापले होते. यंदा त्रिवेदी हे आपला हा विक्रम विश्वविक्रमात बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते मैदानात चालण्यास सुरूवात करणार असून चार जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहापर्यंत ते मैदानाला फेऱ्या मारणार आहेत. यादरम्यान नैसर्गिक विधीसाठी तीन मिनिटांसाठी त्यांना थांबण्यास विक्रमाच्या निरीक्षकांनी परवानगी दिली आहे. या वेगळ्या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी नाशिककरांनी त्रिवेदी यांना साथ देण्याचे आवाहन नाशिक सायक्लिस्टचे अध्यक्ष विशाल उगले यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walking record