मोहम्मद सिराज Photos
मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. त्याचा जन्म १३ मार्च १९९४ रोजी हैदराबादमध्ये एका मध्यमवर्गीय कुटूंबामध्ये झाला. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. आपल्या मुलाच्या स्वप्नांसाठी त्याच्या वडिलांनी खूप मेहनत घेतली. परवडत नसतानाही त्यांनी महागडी क्रिकेट किट सिराजला आणून दिली. लहानपणी गल्ली क्रिकेट खेळत मोहम्मद सिराजने प्रतिभा दाखवायला सुरुवात केली. पुढे मित्राच्या मदतीने त्याने चार मिनार क्रिकेट क्लबमध्ये खेळायची संधी मिळाली. २०१५ मध्ये चारमिनार येथे झालेल्या सामन्यामध्ये त्याने भेदक गोलंदाजी करत पाच गडी बाद केले. या क्रिकेट क्लबमधील चांगल्या कामगिरीच्या बळावर त्याची राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये हैदराबादच्या संघात निवड करण्यात आली.
२०१५-१६ मध्ये मोहम्मद सिराजने रणजी स्पर्धेमध्ये पदार्पण केले. पुढे लगेचच त्याला मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा खेळता आली. २०१६-१७ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने १८.९२ च्या सरासरीने ४१ बळी घेतले. तेव्हा हैदराबादसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. २०१७ च्या आयपीएलमध्ये त्याच्यावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २.६ कोटी रुपयांची बोली लावली. त्यावर्षी तो हैदराबादकडून काही सामने खेळला. पुढे २०१८ च्या लिलावामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सिराजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात सामील केले. तो आरसीबीच्या प्रमुख गोलदांजांपैकी एक आहे.
२०१७ मध्ये सिराजची भारतीय संघात निवड करण्यात आली. तेव्हा न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टी-२० सामन्यामध्ये त्याने केन विल्यमसन या न्यूझीलंडच्या कर्णधाराची विकेट घेत आपली क्षमता दाखवून दिली. २०१९ मध्ये एकदिवसीय, तर २०२० मध्ये कसोटी फॉरमॅटमध्ये त्याने पदार्पण केले. सध्या भारतीय वेगवान गोलदाजांपैकी एक आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला त्याच्या जागी खेळण्याची संधी मिळाली. त्यानेही या संधीचे सोनं करत गोलंदाजांच्या रॅकिंगमध्ये आपले स्थान मिळवले. लवकरच सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठीच्या भारतीय संघामध्ये त्याची समावेश करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकामध्येही तो दिसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read More