सायंकाळी जाहीर होणारे महागाई व औद्योगिक उत्पादनाचे आकडे आशादायक असतील या जोरावर गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात विक्रमी उच्चांकाकडील आगेकूच बुधवारीही कायम राखली. परिणामी आजवर कधीही न दिसलेल्या पातळ्यांपल्याड दोन्ही निर्देशांकांनी दिवसाच्या व्यवहारात मजल मारली. सेन्सेक्सने पहिल्यांदाच बंदअखेर २८ हजार तर निफ्टीने व्यवहारात ८,४०० चा अभूतपूर्व स्तर अनुभवला.
व्यवहारात तब्बल २८,१२६ पर्यंत मजल मारल्यानंतर दिवसअखेर जवळपास शतकी (९८.८४ अंश) वाढीसह मुंबई निर्देशांक २८,००८.९० वर बंद झाला. तर सत्रात ८,४१५.०५ टप्पा गाठल्यानंतर निफ्टी सत्रअखेर मंगळवारच्या तुलनेत २०.६५ अंश वाढीसह ८,३८३.३० वर बंद झाला.
२८ हजाराच्या उंबरठय़ावर खुल्या झालेल्या सेन्सेक्सने २७,९५८.६४ वर तेजीसह सुरुवात केली. दुपारच्या व्यवहारापूर्वीच त्याने २८ हजाराचा टप्पा गाठत २८,१२६.४८ उच्चांकापर्यंत मजल मारली. सत्रात पुन्हा २८ हजाराखाली येत २७,९०० पर्यंतचा त्याने व्यवहारातील तळ राखल्यानंतर अखेर बंद होताना २८ हजाराच्या पातळीपुढे विश्राम घेतला.
सेन्सेक्स यापूर्वी २८ हजारानजीक, २७,९१५.८८ वर ५ नोव्हेंबर रोजी होता, तर २७ हजार ते २८ हजार हा १,००० अंश वाढीचा प्रवास सेन्सेक्सने केवळ ४५ दिवसांच्या व्यवहारांत पूर्ण केला आहे. गेल्या आधीच्या सलग दोन व्यवहारांतील त्याची वाढ किरकोळ ४१.४३ अंशांची होती. निफ्टीचा यापूर्वीचा सर्वोच्च बंद टप्पा १० नोव्हेंबर रोजी ८,३८३.०५ हा होता.
भांडवली बाजारात निर्देशांकांच्या अनोख्या टप्पे गाठणाऱ्या या व्यवहारास अनेक समभागांनीही हातभार लावला. यामध्ये अॅक्सिस बँक, बजाज ऑटो, एचडीएफसी, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आयटीसी, भारती एअरटेल, भेल, कोल इंडिया, डॉ. रेड्डीज, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, टीसीएस यांचा उल्लेख करता येईल.
आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति पिंप ८२ डॉलपर्यंत येणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरांचा आश्वासक परिणामही बाजाराने बुधवारी अनुभवला. तर बुधवारी सायंकाळी जाहीर होणारा संभाव्य घसरता महागाई दर व वाढत्या औद्योगिक उत्पादन दरामुळे रिझव्र्ह बँक व्याजदर कपात करेल, अशी गुंतवणूकदारांची उंचावलेली आशा बाजारात पाहायला मिळाली.
बँक-वाहन समभागांना मागणी!
लवकरच व्याजाच्या दरात कपात होईल, असे कयास बांधत गुंतवणूकदारांनी बुधवारीही व्याजाच्या दृष्टीने संवेदनशील अशा बँका, वाहन क्षेत्रातील समभागांच्या खरेदीचा कल राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन निर्देशांक सर्वाधिक १.१८ टक्क्यांनी उंचावला. एकूणच शेअर बाजारात व्याज दरांशी निगडित क्षेत्र उंचावलेले दिसले. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांनाही मागणी राहिली. मिड व स्मॉल कॅपमध्ये अनुक्रमे ०.४७ व ०.२० टक्क्यांपर्यंत भर नोंदली गेली.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2014 रोजी प्रकाशित
बाजारात उत्साहाचा कळस!
औद्योगिक उत्पादनाचे आकडे आशादायक असतील या जोरावर गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात विक्रमी उच्चांकाकडील आगेकूच बुधवारीही कायम राखली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-11-2014 at 03:49 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markets on a roll bse sensex ends above 28k nse nifty at new peak