छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून राज्यसभेवर सदस्य म्हणून डॉ. कराड यांच्या नियुक्तीनंतर दीर्घकाळ प्रलंबित कामांना मार्गी लावता आले. त्यामुळे या पुढेही त्यांना खासदार म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी उद्योजकांच्या जाहीर कार्यक्रमातून झाली. उद्योजकांच्या माध्यमातून डॉ. कराड यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. सर्वसाधारपणे बंद खोलीतील अशा मागण्या थेट जाहीरपणे झाल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या.
राज्याच्या राजकारणात बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी म्हणून डॉ. कराड यांना पाठबळ देण्यात आले होते. त्यांना थेट केंद्रीय वित्त राज्यमंत्रिपदी नियुक्ती केल्याने दिल्लीमध्ये सरकार दरबारी जाण्याचा मार्ग म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांनी डॉ. कराड यांच्या कारकिर्दीचा उपयोग करून घेतला. अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत केल्याचा उल्लेख करत उद्योजक राम भाेगले यांनी डॉ. कराड यांना पुन्हा संधी देण्याचा विचार करावा, अशी मागणी औद्योगिक संघटनेच्या व्यासपीठावरून केली. भोगले यांनी मांडलेल्या बहुतांश सर्व मागण्या राज्य सरकारकडून अंमलबजावणीमध्ये आणल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जायकवाडीमध्ये तरंगत्या सौरपटलाच्या प्रकल्पाचा त्यांनी उत्तम पाठपुरावा केल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला. मात्र, राजकीय मागणीवर त्यांनी भाष्य केले नाही. मात्र, उद्योग पुरस्कारच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी डॉ. कराड यांच्या निवासस्थानी भोजन केले. त्याचेही आता सकारात्मक राजकीय अर्थ लावले जात आहेत. उर्वरित कालावधीमध्ये काही पटकन प्रकल्प पूर्ण होऊ शकतील, यासाठी डॉ. कराड प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या डॉ. कराड यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल का, याची उत्सुकता आता वाढू लागली आहे.