एमपीएससी मंत्र : राज्यसेवा परीक्षा पॅटर्न बदल; वाढता पॉपकॉर्न इफेक्ट

राज्यसेवा मुख्य परीक्षेचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप बदलून वर्णनात्मक करण्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मागील आठवडय़ामध्ये करण्यात आली.

mpsc
( प्रतिनिधिक छायाचित्र )

फारुक नाईकवाडे
रोहिणी शहा
राज्यसेवा मुख्य परीक्षेचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप बदलून वर्णनात्मक करण्याची घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून मागील आठवडय़ामध्ये करण्यात आली. मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य होते. मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची का होती; त्यामागचे MPSC नेमके काय तर्कशास्त्र होते, हे कोडे गेल्या दहा वर्षांत उलगडत नव्हते. आता हे कोडे सोडविण्यासाठी वेळ वाया घालवायचीही गरज नाही. सुदैवाने एकदाचा पॅटर्न बदलला. आयोगाकडून वेळोवेळी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, गुणांकन, प्रश्नप्रकार अशा बाबतीत कालानुरूप बदल करण्यात येतात. या बदलांचे कधी स्वागत होते तर कधी नाराजीचे सूर उमटतात. काही वेळा उमेदवारांकडून आयोगाबाबत काही अपेक्षाही व्यक्त केल्या जातात.

सन २०२१मध्ये आयोगाकडून वेगवेगळय़ा प्रवर्गातील उमेदवारांना कमाल किती वेळा संधी घेता येईल आणि या संधी कशा प्रकारे मोजल्या जातील याबाबतची घोषणा करण्यात आली. त्यावेळी संधींची मर्यादा आखण्याचे वढरउ चे धोरण तर आयोगाने स्वीकारले, पण मग याच धर्तीवर पूर्वपरीक्षेतील सी सॅट पेपर क्वॉलिफाइंग स्वरूपाचा करण्याबाबत निर्णयही आयोगाने घ्यावा, परीक्षाही वेळच्या वेळी नियमितपणे घ्याव्यात, भरतीसाठी भरपूर पदेही उपलब्ध करून द्यावीत असा सूर उमटू लागला. यातील बऱ्याच अपेक्षा आयोगाकडून पूर्ण होताना दिसत आहेत. आयोगाने UPSCच्या धर्तीवर सीसॅट पेपर क्वॉलिफाइंग स्वरूपाचा करण्याच्या निर्णयाची घोषणा केलेली आहे आणि त्याचे सर्वच उमेदवरांकडून जोरदार स्वागतही झाले आहे.

संधींची संख्या मर्यादीत करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणाही आयोगाने आश्चर्यकारकपणे मागे घेतली आहे. आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी वेगवेगळय़ा प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ ते ४३ वर्षे इतकी आहे. एकदा का या परीक्षांचे वेड लागले की ही वयोमर्यादा पार होईपर्यंत यशाची आशा आणि अपेक्षा ठेवून ‘लढत’ राहाणे याशिवाय अन्य पर्यायच नकोसा होऊन जातो. वयाच्या त्या टप्प्यावर जर अपयशच हाती आले तर पुढे काय, हे भले मोठे प्रश्नचिन्ह आणि असहाय्य अवस्था वाटय़ाला येते. संधींची संख्या मर्यादित असेल तर योग्य वेळी अन्य पर्यायांचा वापर करून करिअरचा मार्ग निवडणे शक्य असते. उपलब्ध अनलिमिटेड संधी म्हणजे करिअरच्या भरकटण्याचीच जास्त शक्यता. त्यामुळे उमेदवारांनी स्पर्धा परीक्षांसाठी आपण किती वर्षे द्यायची आणि किती संधी घ्यायच्या याची मर्यादा ठरवूनच या परीक्षांची तयारी करायला हवी. संधींची मर्यादा ठरवून घेतली की योग्य आणि व्यवहार्य पद्धतीने प्लॅन करणे शक्य आणि सोपे होते. अर्थातच उमेदवारांना हे वेगवेगळय़ा माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न आमच्याकडून गेली अनेक वर्षे सुरूच आहे. मात्र आयोगाच्या घोषणेमुळे याबाबत व्यापक चर्चा घडून येत आहे इतकेच!

सन २०१२ मध्ये मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरुपाची करण्यात आली तर सन २०१३मध्ये पूर्वपरीक्षेत सीसॅट पेपर समाविष्ट करण्यात आला. आता २०२२ मधला राज्यसेवा परीक्षेचे स्वरुप वर्णनात्मक करण्याचा हा निर्णय सन २०१२-१३ नंतरचा सर्वात मोठा आणि खूप दूरगामी परिणाम करणारा निर्णय आहे. या घोषणेबाबत उमेदवारांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अर्थात कोणताही बदल हा लगेच पचनी पडेल अशी अपेक्षा नाहीच पण त्या त्या बदलाबाबत वस्तुनिष्ठ व व्यावहारीकदृष्टय़ा विचार करणे मात्र आवश्यक आहे.

खरे तर राज्य लोकसेवा आयोगाने केंद्र लोकसेवा आयोगाचे अनुकरण करणे ही काही नवीन किंवा चुकीची बाब नक्कीच नाही. उत्तर प्रदेश, बिहार अशा हिंदूी भाषिक राज्यांच्या लोकसेवा आयोगांचे अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती या नेहमीच UPSC अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीप्रमाणेच होत्या व UPSC ने केलेल्या बदलांनुसार त्या सुधारित करण्यात येतात. किंबहुना या राज्यांतील विद्यापीठांमध्येही शैक्षणिक अभ्यासक्रम UPSC च्या अभ्यासक्रमास अनुरूप असेच ठरविण्यात येतात. त्यामुळे या राज्यातील उमेदवारांसाठी केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची एकाच वेळी तयारी करणे खूप सोयीचे आणि यशदायी असते. एकाच तयारीमध्ये एकापेक्षा जास्त परिक्षा देता येणे, करीरच्या जास्त संधी उपलब्ध होणे याला पॉपकॉर्न इफेक्ट म्हटले जाते. तो या हिंदूी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांना नेहमीच मिळत आला आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र याबाबत खूप उशिराने सुरुवात झाली आहे.

मागील दहा वर्षे राज्य सेवा मुख्य परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न पद्धती वापरणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य होते. त्यापूर्वी राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाचीच होती. पण तेंव्हाही वढरउच्या तुलनेत या परीक्षेच्या अभ्यासक्रम आणि प्रश्नांचे स्वरूप यामध्ये टोकाचे अंतर होते. या परीक्षांच्या दृष्टिकोन आणि एकूणच स्वरूपामध्ये दरी होती. त्यामुळे UPSC करणारा MPSC च्या नादाला लागायचा नाही आणि MPSC करणारा UPSC च्या वाटेला जायचा नाही. त्यामुळे उमेदवारांच्या करिअरच्या संधींना मर्यादा पडायच्या.

सन २०१३ मध्ये पहिल्यांदा राज्य लोकसेवा आयोगाने UPSC च्या पूर्वपरीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम स्वीकारला. तेव्हा हा बदल उमेदवारांना सुरुवातीला आव्हानात्मक, अन्यायकारक वाटला असेल, त्याच्याशी जुळवून घेणे अवघड झाले असेल, पण त्यामुळे UPSC ची तयारी करायचा आत्मविश्वासही MPSC करणाऱ्या उमेदवारांमध्ये जागृत झाला हे नाकारता येणार नाही. त्यानंतर गट ब आणि क सेवांचा अभ्यासक्रम आणि पॅटर्न आणि टप्प्याटप्प्याने तांत्रिक सेवांचे पॅटर्नही बदलण्यात आल्यावर या सर्वच परीक्षांमधील साधम्र्यामुळे उमेदवारांसाठी उपलब्ध करिअरच्या संधींमध्ये अनेक पटींनी वाढ झाली. हा पॉपकॉर्न इफेक्ट उमेदवारांची उमेद आणि आत्मविश्वास जागवणारा ठरला. आता राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम UPSC मुख्य परीक्षेसारखा झाल्याने एकाच तयारीमध्ये UPSC आणि MPSC अशा दोन्ही आयोगांच्या वेगवेगळय़ा परीक्षा देणे शक्य होणार आहे. करिअरच्या संधी वाढल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबतचा पॉपकॉर्न इफेक्ट वाढवणारा आहे हे निश्चित!

बदललेल्या पॅटर्न आणि अभ्यासक्रमाबाबत सविस्तर चर्चा पुढील लेखामध्ये करण्यात येईल.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mpsc mantra state service exam pattern change logic park paddhata gukana pranaprakra autoawesome did you mean 35 5000 translation results exam method marking question type carrier amy

Next Story
यूपीएससीची तयारी :  भारत आणि जागतिक महासत्ता
फोटो गॅलरी