माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. “स्वाभिमानाशी तडजोड नाही”, असे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात शर्मांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता शर्मांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत धुसपुस वाढत असल्याचे समोर आले आहे.
हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचे २१ बळी; ढगफुटीमुळे भूस्खलन; अचानक आलेल्या पुरात विध्वंस
पक्षाच्या सल्लागार प्रक्रियेतून डावलल्याची नाराजी शर्मांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी राज्यात काँग्रेससाठी काम करत राहणार, असे शर्मा यांनी म्हटले आहे. आनंद शर्मा हिमाचल प्रदेशातील महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांपैकी एक आहेत. हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी २६ एप्रिलला शर्मांची पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली होती.
“पंडितजी आतापर्यंत आम्ही पाच जणांना मारलंय,” भाजपाच्या माजी आमदाराचे धक्कादायक विधान
काँग्रेसमधील ‘जी २३’ गटातील नेत्यांमध्ये गुलाब नबी आझाद आणि आनंद शर्मा या दोघांचाही समावेश आहे. या वर्षअखेरीस हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणूक आहे. त्यापूर्वी शर्मांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. शर्मा यांनी १९८२ साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर १९८४ रोजी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले होते. त्यानंतर आजतागायत काँग्रेसमधील विविध पदांची जबाबदारी शर्मा यांनी सांभाळली आहे.