पीटीआय, सिमला : हिमाचाल प्रदेशात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन, अचानक आलेल्या पुरात व ढगफुटीच्या घटनांमुळे २१ जण मृत्युमुखी पडले व आठ जण बेपत्ता आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेशकुमार मोख्ता यांनी शनिवारी याविषयी माहिती दिली. मोख्ता यांनी सांगितले, की मुसळधार पावसामुळे मंडी, कांगडा आणि चंबा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ३४ दुर्घटना झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळे रस्ते ठप्प झाले आहेत. हमीरपूर जिल्ह्यात आलेल्या पुरात २२ जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. मुसळधार पावसामुळे कांगडा जिल्ह्यात सकाळी चक्की पूल कोसळल्यानंतर जोगिंदरनगर आणि पठाणकोट मार्गादरम्यानची रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने हा पूल धोकादायक म्हणून जाहीर केले होते. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितले, की प्रशासन पूरग्रस्त जिल्ह्यांत युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे.

उत्तराखंडमधील डेहराडूनमधील एका गावात रात्री उशिरा ढगफुटीमुळे नदीस आलेल्या पुरात पूल वाहून गेले. टोंस नदीकिनाऱ्यावर प्रसिद्ध शिवमंदिर टपकेश्वर महादेवाच्या गुहांमध्ये पाणी भरले होते. रायपूर भागातील सारखेत गावात शुक्रवारी रात्री उशिरा सुमारे दोन वाजता ढगफुटी झाली. सोंग नदीवरील पूल वाहून गेला आणि मसुरीच्या जवळील लोकप्रिय पर्यटनस्थळ केम्प्टी धबधब्याजवळील पाणी धोक्याची पातळी ओलांडून गेले आहे.

गरज भासल्यास लष्कराची मदत

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा केला. त्यांनी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले, की प्रशासन सतर्क असून, आपत्तीनिवारण पथके पूरग्रस्त भागात कार्यरत असून, गरज पडल्यास लष्कराचीही मदत मागवली जाईल.