लोकसभा निवडणूकअंतर्गत राज्यात पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघांत उद्या मंगळवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या सर्व मतदारसंघांत गुरुवारी ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून असून त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अतिदुर्गम भागातील ३५ मतदान केंद्रांसाठी निवडणूक कर्मचारी आज रवाना करण्यात आले आहेत. या मतदानासाठी तीन हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सोमवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पहिल्या टप्प्यात राज्यातील सात लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. त्यामध्ये वर्धा मतदारसंघात १४ उमेदवार निवडणूक लढवत असून रामटेक – १६, नागपूर – ३०, भंडारा-गोंदिया – १४, गडचिरोली-चिमूर – ५, चंद्रपूर – १३ आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह नाना पटोले, भावना गवळी आदी उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे. या मतदारसंघात गेले पंधरा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदी प्रमुख नेत्यांच्या मोठय़ा सभांनी वातावरण ढवळून निघाले आहे. उद्या सायंकाळी या मतदारसंघातील प्रचार संपणार आहे.

अतिदुर्गम भागात मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी व सुरक्षा यंत्रणेची ने-आण करण्यासाठी तीन हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सी-व्हिजिल अ‍ॅपचा राज्यभरात नागरिक प्रभावी उपयोग करीत असून आतापर्यंत दोन हजार  ५२७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी एक हजार ४९७ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून चौकशीअंती आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे.

९७ कोटींचा मुद्देमाल जप्त

राज्यात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत ९७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३० कोटी रुपयांची रोकड, १७ कोटी रुपयांची दारू, ४.६१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ, ४४ कोटी  रुपयांचे सोने, चांदी व इतर मौल्यवान जवाहीर यांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First phase of the campaign will be stopped today