Karnataka : देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. मात्र, कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात गणेशोत्सवाला गालबोट लागलं आहे. मंड्या जिल्ह्यातील नागमंगला येथे बुधवारी रात्री आठ वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यानंतर दोन गटांत दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळीची घटनाही घडली. या घटनेमुळे मंड्या जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यातील नागमंगला या ठिकाणी बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरु होती. या मिरवणुकीवेळी अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीमुळे दोन गटात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. त्यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. तसेच गोळीबार आणि जाळपोळही करण्यात आली. यामुळे नागमंगलामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. जाळपोळीमध्ये रस्त्यावरील काही दुकाने आणि वाहनेही जाळण्यात आली.

हेही वाचा : दोन दहशतवादी ठार ; काश्मीरमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत घातपाताचा कट उधळला

या घटनेमुळे मंड्या जिल्ह्यात तणावावाचं वातावरण निर्माण झालं. या परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केला आहे. सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे. या ठिकाणी तणाव वाढल्यामुळे पोलिसांनी कलम १४४ लागू केलं असून वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थाळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, या दगडफेकीच्या आणि जाळपोळीच्या घटनेत काहीजण जखमी झाल्याची माहिती सांगितली जात आहे. याबरोबरच दगडफेकीच्या घटनेवेळी मोठा जमाव एकत्र आल्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. तसेच जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुरतमध्येही घडली होती अशी घटना

गुजरातमधील सुरतच्या लाल गेट येथील एका गणेश मंडळाच्या मंडपावर रविवारी सायंकाळी दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेनंतर सुरतमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दगडफेकीच्या घटनेनंतर तेथील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यामुळे सुरत पोलिसांनी रात्री लाठीचार्ज केला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणात २७ जणांना अटक करण्यात आली होती. या दगडफेकीत आणि गोंधळामध्ये अनेक पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते. दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या होत्या. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati visarjan 2024 violence in ganesh immersion stone pelting in two groups during ganeshotsav in karnataka police stopped the crowd gkt