भाजपा सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावर केलेल्या आरोपांवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका वर्तमानपत्रातील वृत्ताचा दाखला देत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका वड्रा यांनी मध्य प्रदेशातील भाजपावर ५० टक्के कमिशनचा आरोप केला आहे. असाच आरोप कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने भाजपावर केला होता. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशन घेऊन काम करते असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. काँग्रेसच्या या आरोपानंतर कर्नाटकात सत्ताबदल झाला आहे. आता मध्य प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यापार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात ५० टक्के कमिशनचा आरोप भाजपावर करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील कंत्राटदारांच्या संघटनेने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहून तक्रार केली होती की त्यांना ५० टक्के कमिशन दिल्यानंतरच पैसे मिळतात, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचा दाखला देत ११ ऑगस्ट रोजी प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाजपावर टीकास्र सोडलं होतं.

कर्नाटकातील भ्रष्ट भाजप सरकार ४० टक्के कमिशन घेत असे. मध्य प्रदेशात भाजपाने भ्रष्टाचाराचा स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. कर्नाटकच्या जनतेने ४० टक्के कमिशन सरकारची हकालपट्टी केली, आता मध्य प्रदेशातील जनता ५० टक्के कमिशन सरकारला सत्तेवरून हटवेल,’ असा आरोप प्रियांका यांनी ट्वीटद्वारे केला होता.

या ट्वीटवरून भाजपा कायदेशीर सेलचा कार्यकर्ता निमेश पाठक यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून शनिवारी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. इंदूरमधील संयोगितागंज येथे भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) आणि ४६९ (प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने खोटी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निमेश पाठक यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, “काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या वृत्तपत्राच्या एका वृत्ताबद्दल त्यांना माहिती मिळाली. एका खासदाराने काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराकडून ५० टक्के कमिशन मागितल्याबाबत कंत्राटदार संघटनेने उच्च न्यायालयात पत्र लिहिले होते. हे पत्र ज्ञानेंद्र अवस्थी यांनी लिहिले होते. परंतु, त्यांनी अवस्थीबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांना अशा कोणत्याही संघटनेबद्दल किंवा व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही”.

“मध्य प्रदेश सरकार आणि भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसकडून दिशाभूल करणारे आरोप करून हे पत्र नियोजनबद्ध पद्धतीने विविध सोशल मीडिया साइट्सवर व्हायरल केले जात असल्याचा संशय आहे . जर ते खरे असेल आणि ज्ञानेंद्र अवस्थी प्रत्यक्षात उपलब्ध असतील तर मध्य प्रदेश सरकारच्या धोरणानुसार आणि नियमांनुसार कठोर कारवाई केली जावी,” असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

पोलिस तक्रारीवर प्रतिक्रिया देताना कमलनाथ म्हणाले, “भ्रष्टाचाराची हजारो प्रकरणे आहेत. भाजपा किती जणांवर गुन्हा दाखल करणार? आता संपूर्ण राज्यात भ्रष्टाचार उघड होत असताना त्यांच्याकडे उपाय काय? ते पत्र खोटे की खरे, इथे उभ्या असलेल्या लोकांना विचारा. हे सर्व लोक तुम्हाला एक नव्हे तर १००-२०० पत्रे सांगतील.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indore police file fir after priyanka gandhi vadras social media post on 50 commission government sgk