सीमा सुरक्षा दलातील बडतर्फ जवान तेज बहादूर यादव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासंदर्भात वक्तव्य करीत असल्याची एक चित्रफित समाजमाध्यमावर असून त्याबद्दल  मौन पाळल्याबद्दल भाजपने मंगळवारी विरोधी पक्षांवर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपने पत्रकार परिषदेत ही चित्रफित दाखविली. त्यामध्ये यादव हा मोदी यांची हत्या करण्याबाबत आणि हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना आपण ओळखत असल्याबाबत वक्तव्य करीत असताना दिसत आहे.

ही अत्यंत गंभीर बाब आहे, पंतप्रधानांच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे, निवडून आलेल्या पंतप्रधानांची हत्या करण्याचा कट रचण्यात येत असल्याबद्दलचा हा प्रश्न आहे, असे असताना विरोधक गप्प का, असा सवाल भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. तेज बहादूरने जे वक्तव्य केले आहे त्याच्याशी विरोधक सहमत आहेत का, असा प्रश्नही पात्रा यांनी विचारला आहे.

सपा आणि बसपाने यादव यांना वाराणसी मतदारसंघातून मोदी यांच्याविरुद्ध उमेदवारी दिली आहे, त्यामुळे अखिलेश यादव आणि मायावती त्याबाबत माफी मागणार का, असा सवालही पात्रा यांनी उपस्थित केला आहे.

एका व्यक्तीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावली तेव्हा त्यावर विरोधकांनी आवाज उठविला, मात्र मोदी यांच्या हत्येची धमकी देण्यात आली असतानाही विरोधक गप्प आहेत, असे पात्रा म्हणाले.

५० कोटी रुपये दिल्यास मोदी यांची हत्या करण्यात आपण तयार आहोत, असे वक्तव्य यादव करीत असल्याची चित्रफितीत आहे. या चित्रफितीमधील व्यक्ती आपणच असल्याचेही यादव यांनी मान्य केले, मात्र त्यात फेरफार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

वैफल्यापोटी विरोधकांची टीका -पांडा

लोकसभा निवडणुकीत पराभव होत असल्याचे दिसत असल्याने विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत असल्याचा आरोप भाजप उपाध्यक्ष जय पांडा यांनी केला आहे.  काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांची तुलना दुयरेधनाशी करणे हे वैफल्यतेचे लक्षण आहे, असा टोला पांडा यांनी लगावला. मोदींनी काँग्रेस नेत्यांच्या पूर्वीच्या चुका दाखविल्यावर इतका तिळपापड होण्याचे कारण काय, असा सवाल भाजपचे माध्यमप्रमुख अनिल बलुनी यांनी विचारला. त्यांचा संदर्भ पंतप्रधानांनी राजीव गांधी यांच्याबाबत केलेल्या टीकेचा होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawanis statement about modi