Manmohan Singh Last Rites Day And Date : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात ९२ व्या वर्षी निधन झाले. काल सायंकाळी घरी अचानक बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काल रात्री ९.५१ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. यानंतर देशभरात शोककळा पसरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मरणार्थ देशभरात सात दिवसांचा राजकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. या कालावधीत, संपूर्ण देशात राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. या राजकीय दुखवटा काळात कोणतेही अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव आज त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात आले आहे. उद्या सकाळी ८ वाजता त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात नेले जाईल त्यानंतर सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान सर्वांना मनमोहन सिंह यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. दरम्यान उद्या सकाळी ९. ३० वाजता काँग्रेस कार्यालयातून अंतयात्रेला सुरुवात होणार आहे.

कधी होणार अंत्यसंस्कार?

दरम्यान मनमोहन सिंग यांच्या कन्या आज सायंकाळी अमेरिकेतून दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यामुळे उद्या (शनिवार) मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

कुठे होतात माजी पंतप्रधानांवर अंत्यसंस्कार?

देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष स्मृतीस्थळांवर केले जातात. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांवर दिल्लीतील राजघाट संकुलात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्याचबरोबर अनेक माजी पंतप्रधानांसाठी स्वतंत्र समाधी स्थळेही बांधली आहेत. असे असले तरी, अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या धार्मिक मान्यतेनुसार आहे.

सामान्यतः, माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीत होतात, परंतु त्यांचे अत्यंसंस्कार त्यांच्या गृहराज्यात देखील होऊ शकतात. त्यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री आणि देशातील इतर मान्यवर उपस्थित असतात.

माजी पंतप्रधानांच्या पार्थिवाच्या अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल

भारतात, माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विशेष प्रोटोकॉल पाळला जातो. देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा आणि पदाचा सन्मान करणे हा त्यामागचा उद्देश आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांचे पार्थिव भारताच्या राष्ट्रध्वजात म्हणजेच तिरंग्यात गुंडाळले जाते. याशिवाय अंत्यसंस्कार करताना २१ तोफांची सलामीही दिली जाते. याशिवाय लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही अंत्यसंस्कारात सहभागी होतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manmohan singh last rites details announced aam