नवी दिल्ली : विकासातील अडथळे असलेला भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला देशातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी या दोन गोष्टींचा तिरस्कार करावा, असे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७६ व्या स्वातंत्र्यदिनी, येत्या २५ वर्षांत देशाला ‘विकसित राष्ट्र’ बनवण्यासाठी ‘पंचप्रण’( पाच संकल्प) जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या सलग नवव्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले, की आता देशाने मोठे ध्येय समोर ठेवले पाहिजे. ते मोठे ध्येय म्हणजे ‘विकसित भारत’ हे आहे. देशाला वाळवीप्रमाणे पोखरणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच्या निर्णायक टप्प्यात आपण प्रवेश केला आहे. घराणेशाहीचे आव्हान केवळ राजकारणापुरते मर्यादित नसल्याचे स्पष्ट करून मोदी म्हणाले की, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराला नागरिकांनी विरोध केला पाहिजे.

देशाची विविधता, नागरिकांतील एकता, स्त्री-पुरुष समानता, संशोधन आणि नावीन्यता त्याचबरोबर संघराज्य व्यवस्थेबद्दलही मोदी यांनी भाष्य केले. स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असून देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. या दिवसापासून एक नवीन संकल्प घेऊन पुढे जाण्याची ही वेळ आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी संशोधन आणि नवनिर्मितीला चालना देण्यासाठी ‘जय अनुसंधान’ ही घोषणा केली. महिलांच्या सन्मानासह अनेक बाबींवर पंतप्रधानांनी भर दिला, परंतु कोणताही नवा उपक्रम किंवा योजना त्यांनी जाहीर केली नाही.

देशात विकसित करण्यात आलेल्या २१ हॉवित्झर तोफांच्या सलामीत पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावरून गेल्या ७५ वर्षांत प्रथमच देशी बनावटीच्या तोफांची सलामी राष्ट्रध्वजाला दिली गेली.

आमच्या आचरणात एक विकृती निर्माण झाली आहे. आम्ही कधीकधी महिलांचा अवमान करतो, असे निदर्शनास आणून, ‘‘आपण आपल्या वर्तनात सुधारणा करण्याची आणि अशा गोष्टींपासून मुक्त होण्याची शपथ घेऊ शकतो का?’’ असा प्रश्न मोदी यांनी विचारला. ‘महिलांचा सन्मान’ हा देशाच्या विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आपल्या वक्तव्यांतून आणि वर्तनातून महिलांचा अवमान होईल, अशी कोणतीही गोष्ट न करणे महत्त्वाचे आहे, असे मोदी यांनी नमूद केले.

गेल्या ७५ वर्षांतील देशाच्या कामगिरीबद्दल आत्मसंतुष्ट न राहता आता स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत म्हणजे येत्या २५ वर्षांत ‘पंचप्रण’ पूर्ण करण्यावर आपले सामर्थ्य आपल्याला केंद्रित करावे लागेल, असा निर्धार मोदी यांनी व्यक्त केला. देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे ‘पंचप्रण’ म्हणून त्यांनी पाच प्रतिज्ञांचा उल्लेख केला. त्यांत वसाहतवादी मानसिकतेच्या कोणत्याही खुणा नष्ट करणे, वारशाचा अभिमान, ऐक्याची ताकद अबाधित ठेवणे, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह सर्व नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडणे आदींचा समावेश आहे. आपल्याला हे पाच संकल्प डोळय़ासमोर ठेवून पुढे जायचे आहे. त्यामुळे आगामी २५ वर्षांत आपल्या स्वातंत्र्यसेनानींची स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी केले.

आगामी २५ वर्षांना मोदी यांनी ‘अमृतकाल’ असे संबोधले आहे आणि या अमृतकालात प्रत्येक नागरिक मोठय़ा उत्साहात आणि अधीरतेने नव्या भारताची प्रगती पाहण्याची आकांक्षा बाळगून असल्याचे सांगितले. रांगेतील शेवटच्या माणसाला सक्षम करण्याची महात्मा गांधींची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वत:ला झोकून दिले आहे, असा दावा मोदी यांनी केला. हा ‘अमृतकाल’ आम्हाला एका महत्त्वाकांक्षी समाजाची स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याची सुवर्णसंधी देत आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

संरक्षण दलांचे कौतुक

अतिवेगवान क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’च्या निर्यातीचा उल्लेख मोदी यांनी केला आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पात संरक्षण दलाने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. त्याचबरोबर मोदी यांनी लाला किल्ल्यावरून प्रथमच सलामी देणाऱ्या देशी बनावटीच्या २१ हॉवित्झर तोफांचाही उल्लेख केला. या तोफा ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुढाकारातून विकसित करण्यात आल्या आहेत. त्यांनी जवानांचे अभिनंदनही केले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन असो की मोबाइल फोनचे उत्पादन, देश आज वेगाने प्रगती करीत आहे. जेव्हा आपले ब्राह्मोस जगात जाईल तेव्हा कोणत्या भारतीयाला आकाशाएवढा आनंद होणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महिलाशक्तीचा सन्मान

वक्तव्यातून आणि वर्तनातून महिलांचा अपमान करण्याची मानसिकता नष्ट करा, असे नमूद करीत पंतप्रधान मोदी यांनी महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे कोणतेही वर्तन न करण्याची शपथ घेण्याचे आवाहन देशवासीयांना केले. आपल्या रोजच्या बोलण्यात आणि वर्तनात विकृती आहे. महिलांचा अपमान करणारी भाषा आणि शब्द आपण आकस्मिकपणे वापरत आहोत. महिलांना अपमानित करणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून आपण मुक्त होण्याचे वचन देऊ शकत नाही का, असा प्रश्नही त्यांनी नागरिकांना विचारला. राष्ट्राची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महिलांचा अभिमान ही एक मोठी संपत्ती आहे. महिलांचा सन्मान हा देशाच्या विकासातील आधारस्तंभ आहे, असेही मोदी यांनी नमूद केले.

अमृतकालीन प्रण

स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंतची आगामी २५ वर्षे हा ‘अमृतकाल’ आहे. त्यासाठी ‘पंचप्रण’ पूर्ण करण्यावर आपण आपली शक्ती एकवटली पाहिजे, असा निर्धार करून पंतप्रधानांनी देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचे ‘पंचप्रण’ म्हणून पाच संकल्प दिले. त्यांत विकसित भारताची निर्मिती, वसाहतवादी मानसिकतेच्या कोणत्याही खुणांचा नायनाट, वारशाचा अभिमान, ऐक्याची ताकद अबाधित ठेवणे, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह सर्व नागरिकांनी आपली कर्तव्ये पार पाडणे यांचा समावेश आहे.  

सरकार आत्ममग्न: सोनिया गांधी</strong>

नरेंद्र मोदी सरकार आत्ममग्न आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. राजकीय फायद्यासाठी स्वातंत्र्य योद्धय़ांच्या बलिदानाचे महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्नांना तीव्र विरोध करण्यात येईल, असे सोनिया गांधी म्हणाल्या. भाजपने रविवारी फाळणीसंदर्भात प्रसारित केलेल्या एका चित्रफितीबद्दलही सोनिया यांनी तीव्र आक्षेप नोंदविला.

मोदी म्हणाले..

* रांगेतील शेवटच्या माणसाला सक्षम करण्याची महात्मा गांधींची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी समर्पित.

* स्त्री-पुरुष समानता एकतेचे पहिले पाऊल, ‘महिलांचा सन्मान’ देशाच्या विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ.

* भारत लोकशाहीची जननी आहे. विविधतेतील अंगभूत शक्ती भारताकडे आहे, देशभक्तीच्या समान धाग्यामुळे देश कणखर. 

* देशाला वाळवीप्रमाणे पोखरणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधातील लढाईच्या निर्णायक टप्प्यात भारताचा प्रवेश.

*संशोधन आणि नवनिर्मितीला चालना देण्यासाठी ‘जय अनुसंधान’.

बायडेन यांच्या शुभेच्छा

वॉशिंग्टन, पॅरिस : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन आदींनी भारतीयांना शुभेच्छा दिल्या. बायडेन यांनी भारताच्या लोकशाही प्रवासातील महात्मा गांधींचे योगदान आणि त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या संदेशाचे स्मरण केले. यंदा अमेरिका आणि भारत राजनैतिक संबंधांचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर बायडेन म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी, हिंद-प्रशांत क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही लोकशाही देश एकत्र काम करतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi calls out corruption nepotism in his independence day speech zws
First published on: 16-08-2022 at 04:32 IST